परीक्षण – समर्पित जीवनाचे हृदयंगम बोल
>> श्रीकांत आंब्रे
रुग्णसेवेचा वसा घेतलेले व खडतर जीवनसंघर्ष करत रुग्ण तसंच अनेक थोरामोठय़ांच्या हृदयात आदराचं स्थान मिळवणारे नामांकित हृदयविकारतज्ञ डा. अनिल तांबे यांच्या गेल्या पन्नास वर्षांतील वैद्यकीय सेवाकार्याचा धावता प्रवास मांडण्याचा प्रयत्न ‘हृदयीराजा’ या त्यांच्या चरित्र लेखनात त्यांचे स्नेही प्रफुल्ल चिटणीस यांनी केला आहे. ठाण्यात 1988 मध्ये सुरू झालेलं त्यांच्या स्वतःच्या मालकीचं ‘डा. तांबे हार्ट आण्ड मेडिकल हास्पिटल’ हे मुंबईनंतर हृदयविकारावर उपचार करणारं एकमेव सुसज्ज रुग्णालय होतं. सुखवस्तू घरात जन्म होऊनसुद्धा त्यांना करावा लागणारा जीवनसंघर्ष आणि त्यातून तावून सुलाखून निघालेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहिलं की त्यांची जीवनाला सामोरी जाणारी धैर्यशील आणि करारी प्रतिमा डोळय़ासमोर येते. डाक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्यातून उलगडत जातात. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले तसंच नामांकितांकडून नावलौकिक मिळवला. त्यामागे वर्षानुवर्षाची तपस्या आणि अभ्यास याचं पाठबळ होतं. डा. तांबे यांनी वैद्यकीय व्यवसाय केवळ अर्थप्राप्तीच्या हेतूने केला नाही, तर या क्षेत्रावर त्यांचं आत्यंतिक प्रेम असल्याचं अनेक प्रसंगांतून जाणवतं. आज वयाची एंsशी वर्षे पूर्ण होतानाही ते तरुणासारखे सतत कार्यरत आहेत. त्यामुळेच त्यांचं नाव वैद्यकीय क्षेत्रात आस्थेने घेतलं जातं. कौटुंबिक आपत्तींना धीराने तोंड देत आपल्या वैद्यकीय सेवेत खंड पडू न देणारे डाक्टर विरळाच. त्यांचे वडील वेळेचा अपव्यय न करता खटल्यांचा फडशा पाडण्यात हातखंडा असलेले न्यायाधीश म्हणून ओळखले जात. न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे ही त्यांची धारणा होती. वडि}ांच्या न्यायप्रियतेची छाप डा. तांबे यांच्यावर होती. वैद्यकीय ज्ञानावरी} त्यांचं प्रभुत्व सकारात्मक वृत्ती, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, रुग्णांना दिलासा देत त्यांच्यातील आत्मविश्वास जागवण्याची त्यांची दृष्टी, ईश्वरावर दृढ श्रद्धा चरित्रात ठायी ठायी दिसते. रोगाचं निदान करण्याचं त्यांचं वैशिष्टय़ तर वादातीत होतं. आयुष्यात आलेले योगायोग आणि त्यांना थोर व्यक्तिमत्त्वांचा लाभलेला सहवास पाहून अचंबित व्हायला होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घरी त्यांची झालेली अकल्पित भेट, सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याचं त्यांना लाभलेलं भाग्य, त्यांचा आवडता अभिनेता गुरुदत्त याच्या आत्महत्येनंतर जेजे इस्पितळात जवळून पाहायला मिळालेलं त्याच्या देहाचं शवविच्छेदन, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याशी मैत्रीचं नातं आणि त्यांच्या हृदयविकारावर त्यांनी केलेले उपचार, गीतकार पी. सावळाराम यांचे पामिली डाक्टर म्हणून त्यांचा }ाभलेला स्नेह, डा. बी.के गोयल, कुसुमाग्रज, योगाचार्य अण्णा व्यवहारे यासारख्या अनेक थोरामोठय़ांच्या लाभलेल्या सहवासातून त्यांचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होत गेलं. पंढरीच्या वारकऱयांच्या मार्गावर तीन-तीन दिवस ठाण मांडून केलेली आरोग्यसेवा यातून त्यांचं समाजभान दिसतं.
‘हृदयीराजा’चं लेखन प्रफुल्ल चिटणीस यांनी चित्रदर्शी शैलीत सुरेख ओघवत्या भाषेत केलं आहे. पुस्तकात भरपूर छायाचित्रं आहेत. मिलिंद नार्वेकर यांचं मुखपृष्ठ व सजावट देखणी आहे. यातली सहज सोपी शब्दकळा आणि प्रसंग जसेच्या तसे डोळय़ासमोर उभे करण्याची त्यांची हातोटी यामुळे हे चरित्र न वाटता एखादी कादंबरी वाचल्याचं नक्की जाणवेल.
हृदयीराजा- (डा. प्रो. अनिल तांबे यांचा जीवनप्रवास)
लेखक ः प्रफुल्ल चिटणीस
प्रकाशक ः व्यास पब्लिकेशन हाऊस, ठाणे
स्वागतमूल्य ः रु. 500/-
पृष्ठे ः 208
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List