संविधान हातात घेत महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली शपथ, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या शिलेदारांचा विधानसभेत आवाज
मारकडवाडी गावात दडपशाहीने वागणाऱ्या महायुती सरकारच्या निषेधार्थ शनिवारी विरोधकांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेता सभात्याग केला होता. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे विजयी शिलेदार तसेच महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षाच्या मिळून 106 आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उर्वरित आठ आमदार अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी आता उद्या होईल.
विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी 7 डिसेंबरपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 173 सदस्यांनी शपथ घेतली. विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी, सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी शपथविधीचा कार्यक्रम पुकारला. महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींपासून शपथविधीला सुरूवात झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली. विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, ज्योती वाघमारे यांनी सभागृहात संविधान दाखवत शपथ पूर्ण केली. त्याचबरोबर माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, भास्कर जाधव, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, अमित देशमुख, दिलीप सोपल, बाबाजी काळे, संजय देरकर, गजानन लवटे, कैलास पाटील, प्रवीण स्वामी, डॉ. राहुल पाटील, नितीन देशमुख, सिद्धार्थ खरात, सुरेश धस, विश्वजित कदम, सुनील प्रभू, ज्योती गायकवाड, अनंत नर, सुनील राऊत, संजय पोतनीस, अजय चौधरी, रोहित पवार, राहुल आवाडे, हारुन खान, महेश सावंत, सुमित वानखेडे, अमीन पटेल यांच्यासह 106 आमदारांनी शपथ घेतली.
विक्रम पाचपुते यांचे नाव चुकले
शपथविधी नावाच्या यादीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिंरजीव विक्रम पाचपुते यांचे नाव चुकले. विक्रमऐवजी विकास झाल्याची चूक हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर विक्रम पाचपुते यांनी शपथ पूर्ण केली.
गणपतराव देशमुख यांचे स्मरण
सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांचे स्मरण करीत शपथ घेतली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे भीष्माचार्य गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करून शपथ पूर्ण केली
रोहित पाटील झाले भावुक
दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे सदस्यत्वाची शपथ घेताना अत्यंत भावुक झाले. त्यांना वडील आर. आर. पाटील यांची प्रकर्षाने आठवण आली. सर्वसामान्य जनतेला साक्षी ठेवत त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
आठ आमदार अनुपस्थित
287 आमदारांपैकी पहिल्या दिवशी 173, तर दुसऱ्या दिवशी 106 आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान, उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके हे सदस्य पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शपथविधीला अनुपस्थित राहिले. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शपथविधीला उपस्थित राहणार नाही, असे पत्र विधिमंडळाला दिले होते.
आमश्या पाडवी अडखळले
शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांना सदस्यत्वाची शपथ वाचण्यासाठी कालिदास कोळंबकर यांनी मदत केली. पाडवी यांना कागदावर लिहिलेली शपथ वाचताना अडचण येत होती. कोळंबकर सतत त्यांना ‘प्रॉम्पटिंग’ करत होते. शपथ घेतल्यावर त्यांनी ‘जय आदिवासी’चा नारा दिला. शपथ घेताना सतत अडखळत असल्याचा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर मात्र चांगलाच व्हायरल झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List