ईव्हीएमविरोधात जनतेचा उठाव, बॅलेटसाठी बॅटल… गावागावांत ठराव घ्या; शरद पवारांनी फुंकले रणशिंग
भाजपच्या ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध समाज आता जागरूक होतोय. ईव्हीएम हे एकप्रकारे लोकशाहीवरचे संकट बनले आहे. देशावर, समाजावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा महाराष्ट्र पेटून उठला होता असा इतिहास आहे. ईव्हीएम घोटाळ्यानिमित्त इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. सोलापूरच्या मारकडवाडीत ईव्हीएमविरोधात ठिणगी पडली आहे. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर मतदान घ्या, अशी गावाची मागणी आहे. गावाने मतपत्रिकांवर मतदान प्रक्रियाही राबवण्याचा निर्णय घेतला, परंतु प्रशासनाने त्यांना जमावबंदी केली. त्यामुळे आता बॅलेटसाठी बॅटल सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गावाला भेट दिली. या भेटीला विशाल मेळाव्याचे स्वरूप आले.
गावकऱ्यांची मोठी गर्दी उसळली. या गर्दीच्या साक्षीने मतपत्रिकांवरच मतदान घेण्यासाठी गावागावांमध्ये ठराव करा, असे आवाहन करत शरद पवार यांनी रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीतील मताचा ट्रेंड व लागलेला निकाल आश्चर्यकारक असल्याने जनतेला निकालाची आस्था राहिली नाही. त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. सबंध देशभर मारकडवाडीच्या घटनेची चर्चा सुरू आहे. या गावाने संपूर्ण देशाला जागे केले आहे. म्हणूनच लोकशाही जिवंत ठेवायची असेल, लोकांच्या मागणीला न्याय मिळत नसेल तर लढा उभारून न्याय मिळवू. याकरिता गावागावांत ईव्हीएमवर मतदान नको म्हणून ठराव केले पाहिजेत. मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
आयोगाला जाब विचारणार
राज्य सरकार, केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला उघडपणे आव्हान देत शरद पवार म्हणाले, गावातील दडपशाहीच्या सर्व रेकॉर्डची, जमावबंदी, पेलीस केसेस याची माहिती द्या. ते आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला देऊन जाब विचारू, असे सांगत, ‘म्हातारी गेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये’ असे म्हणत वेळीच तुमच्या अधिकारावरील संकटाला थोपवू, असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडीला भेट द्यावी
मुख्यमंत्री फडणवीस यांनाही ठणकावताना शरद पवार म्हणाले, या गोष्टीत आम्हाला राजकारण करायचे नाही; पण जनतेच्या मनातील शंका दूर झाली पाहिजे. गैरविश्वास निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारकडवाडीला भेट द्यावी व गावकऱ्यांना सहकार्य करावे. मारकडवाडीचा आवाज संसदेत उठवणार असून, हा प्रश्न धसास लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि न्याय मिळविल्याशिवाय थांबणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात एकंदरीत अशीच परिस्थिती आहे. मतदानाच्या निकालावर जनता समाधानी नाही. निकालाचे आकडे आश्चर्यकारक आहेत. मारकडवाडी गावातून उठाव झाल्यामुळे माळशिरस तालुक्यातील काही गावांचे फेरमतदान घेण्याच्या मागणीचे ठराव मला मिळाले आहेत. ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्र करून देण्याची तयारीसुद्धा केली आहे. त्यामुळे मारकडवाडीतून हा वणवा देशभर पसरणार असून, ही तर फक्त आंदोलनाची सुरुवात आहे. येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, वंदना चव्हाण, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, अनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजीनामा देऊन पुन्हा जिंकून दाखवेन
माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर म्हणाले, माळशिरस तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात ग्रामस्थांचा ठराव मंजूर करून घेण्याची भूमिका घेतली आहे. लवकरच सगळे ठराव पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. तसेच ग्रामस्थांचे ‘ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव’चे व बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीचे प्रतिज्ञापत्र ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच देशाच्या निवडणूक आयोगाने दखल घेऊन पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविली तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा रणांगणात उतरून मोठ्या मतांनी निवडणूक जिंकून दाखवीन, असे सांगितले.
ईव्हीएमविषयी संभ्रम निर्माण केल्यास कारवाई
मारकडवाडीमधील निवडणूक मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे झाली आहे. यात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते. त्यांच्या सह्या आहेत. निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. परंतु काहींनी याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा आणि फेरमतदान करण्याचा प्रयत्न केल्याने 89 जणांवर कडक कारवाई केली आहे. यापुढे पुन्हा संभ्रम निर्माण करण्याचा, अफवा पसरविण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करू, असे सोलापूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
आम्हाला आमचं मत तपासायचं आहे!
‘आम्ही इकडे एक मत दिले की तिकडे दोन मते पडली आहेत’, असे सांगत मारकडवाडी गावचे माजी सरपंच दगडू तानाजी मारकड यांनी आम्हाला आमचं मतदान तपासायचं आहे, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, राम सातपुते यांनी आम्हाला फसविले असून, गावाला कोणताही निधी दिला नाही. बाळूमामा मंदिरालाही मदत केली नाही. मात्र, ते स्वतःसाठी चार-चार बंगले घेत आहेत. मशिनमध्ये गडबड असल्याने आमचा राग असून, मतपत्रिकेवर मतदान घ्या. मशिनमध्ये गडबड असल्यानेच घोळ झाला आहे, असे ठासून सांगत त्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला.
शरद पवारांसमोरच उपस्थित ग्रामस्थ महिलांनी एल्गार पुकारला. आमचे मतदान कोठे गेले ते समजले नाही. ते बघायचे होते. पण बॅलेट पेपरवर प्रशासनाने मतदान करू दिले नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. पोलिसांनी दमदाटी करून गुन्हे दाखल केले. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अशी भूमिका महिलांनी मांडली. ‘ईव्हीएम हटवा आणि देश वाचवा’, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
अमेरिकेने व काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा विचार केला, पण ईव्हीएममध्ये पारदर्शकता नसल्याने मत मतपेटीत टाकण्याचा लोकांचा अधिकार त्या देशांनी अबाधित ठेवला. युरोप खंडातल्या बहुतांश देशांमध्ये ईव्हीएमवर मतदान होत नाही. अख्खं जग बॅलेट पेपरवर मतदान करतंय तर भारतात तसं का होत नाही, अशा शंकेने लोक अस्वस्थ आहेत.
निवडणूक आयोग मारकडवाडीला का घाबरतोय? आदित्य ठाकरे यांचा सवाल
मॉक पोलपेक्षा बॅलेट पेपरवर मतदान व्हावे ही मारकडवाडीतील जनतेची मागणी आहे. मॉक पोलमुळे काही बदलणारे नाही. सरकार बदलणार नाही किंवा निवडणूक आयोगाचा निर्णय बदलणार नाही, पण सत्य काय आहे हे तर समजेल. कारण हा देश सत्यमेव जयतेवर चालतो, सत्तामेव जयतेवर नाही. सत्तामेव जयतेवर सरन्यायाधीश चालतात असा जोरदार हल्ला करतानाच, निवडणूक आयोग मारकडवाडीला का घाबरतोय, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मारकडवाडीला जाणार का अशा प्रश्नाला उत्तर देताना, नक्कीच जाणार, असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List