महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार, संख्याबळाची अट कायद्यात नाही
विरोधी पक्षनेता निवडीसाठी संख्याबळाची अट सांगितली जाते, पण कायद्यात तशी तरतूद नाही. विरोधी पक्षनेते पद आम्ही मागणार आहोत. पण त्याची प्रक्रिया विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर सुरू होते. त्यामुळे अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आम्ही ही मागणी करणार आहोत, असे शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी आज सांगितले.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या रविवारच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, गटनेते भास्कर जाधव, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, अजय चौधरी, संजय पोतनीस, सचिन अहिर, सुनील राऊत, नितीन देशमुख, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह महाविकास आघाडीचे अन्य आमदार उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर भास्कर जाधव व नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव म्हणाले की, राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे असतात तेवढेच विरोधक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले.
नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा राहिली आहे. विरोधी पक्षनेता यासंदर्भात व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत ‘आप’ने भाजपचा विरोधी पक्षनेता तयार केला होता. ही भूमिका आम्ही मांडली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यामध्ये कोणत्याही संख्याबळाची अट नाही. तशी कायद्यात तरतूद नाही. ही अट जाणीवपूर्वक सोयीनुसार लादलेली आहे. विरोधी पक्षनेते पद आम्ही मागणार आहोत. पण त्याची प्रक्रिया अध्यक्षांची निवड झाल्यावर सुरू होते. त्यामुळे त्यानंतर ती मागणी करणार आहोत, शिवसेना विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव म्हणाले.
मुख्यमंत्री सकारात्मक
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली व विरोधी पक्षनेता आणि विधानसभा उपाध्यक्ष ही पदे मिळावीत असा प्रस्ताव ठेवला. त्याला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List