विशेष – शिकागो… एका शहराची फिनिक्स भरारी
>> विशाल अहिरराव
यूएस काऊन्सलेट जनरल मुंबईच्या इंटरनॅशनल व्हिझिटर लिडरशिप प्रोग्रामच्या निमित्तानं मराठी पत्रकारितेतील सर्वसमावेशकतेच्या अभ्यास दौऱयासाठी अमेरिकेत जाणं झालं. शिकागोला भेट देताना दिसलं की, या शहरानं विवेकानंदांच्या खुणा जपल्या आहेत. त्यांचे प्रेरणादायी विचार आणि शिकागोचं पुनरुत्थान यात समान धागा आहे असं जाणवत राहतं. विविध देशांमधून आलेल्या स्थलांतरितांना सामावून घेणाऱया शिकागोचा इतिहास समजून घेतला तर कळतं, हे केवळ एक शहर नाही तर ‘फिनिक्स’ भरारीचं आदर्श उदाहरण आहे.
‘फिनिक्स’… ग्रीक पौराणिक कथेमधील एक काल्पनिक पक्षी, ज्याचा जन्मच राखेतून. पंख अग्नीचे, संबंध सूर्याशी, जीवनातील सत्याचं आणि प्रवाह नित्यतेचं तत्त्वज्ञान सांगणारा हा पक्षी. काल्पनिक असला तरी रूपकातून हजारो वर्षांपासून पुनरुत्थानाची प्रेरणा देत राहिलेला. होय, पुनरुत्थान. प्रत्येकाचा चढता-उतरता काळ असतो मग व्यक्ती, समाज, शहर, देश असो की संस्कृती, पडता काळ आला की राख होते. मात्र या राखेखाली एक विस्तव धगधगत असतो आणि थोडय़ाशा हवेनं राख सरून विस्तव पुन्हा पेट घेतो. अगदी त्याचंच रूपक म्हणजे ‘फिनिक्स’. अगदी असंच घडलं आहे अमेरिकतल्या शिकागो शहराच्या बाबतीत.
खरं तर शिकागो म्हटलं की, हिंदुस्थानींना सगळ्यात पहिले आठवतात ते `Sisters and Brothers of America’ म्हणत अमेरिकनांना जिंकून घेणारे, संपूर्ण जगाला वैदिक तत्त्वज्ञानाचं महत्त्व समजावणारे स्वामी विवेकानंद. जवळपास हजार वर्षांच्या आक्रमणांनी घायाळ झालेल्या आणि स्वकीयांच्या भेदांच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदुस्थानींच्या स्वातंत्र्याच्या आशा मावळल्या होत्या. अशा पारतंत्र्यात अडकलेल्या हिंदुस्थानातून येऊन विवेकानंदांनी जगाला विश्वबंधुत्व समजावलं. ज्ञान आणि कर्मयोगाच्या पंखांसह वैदिक तत्त्वज्ञानानं घेतलेली ‘फिनिक्स’ भरारी, पुनरुत्थानच होतं. यूएस काऊन्सलेट जनरल मुंबईच्या इंटरनॅशनल व्हिझिटर लिडरशिप प्रोग्रामच्या निमित्तानं मराठी पत्रकारितेतील सर्वसमावेशकतेच्या अभ्यास दौऱयासाठी अमेरिकेत जाणं झालं. शिकागोला भेट देताना दिसलं की, या शहरानं विवेकानंदांच्या खुणा जपल्या आहेत. त्यांचे प्रेरणादायी विचार आणि शिकागोचं पुनरुत्थान यात समान धागा आहे असं जाणवत राहतं. विविध देशांमधून आलेल्या स्थलांतरितांना सामावून घेणाऱया शिकागोचा इतिहास समजून घेतला तर कळतं, हे केवळ एक शहर नाही तर ‘फिनिक्स’ भरारीचं आदर्श उदाहरण आहे.
इथली ‘ऑर्किटेक्चर बोट राईड’ करताना शहराचा इतिहास समोर ठेवला जातो. शिकागो नदीच्या काठावर, भव्य इमारतींच्या खाली एकेकाळी राख झालेलं जुनं शहर आहे. इथली प्रसिद्ध ‘बोट राईड’ करताना इथले गाईड शिकागोतील भव्य वास्तू कशा उभ्या राहिल्या, त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्टय़ं सांगताना शहराच्या इतिहासावर ब्रश फिरवून तो आपल्या डोळ्यांसमोर शार्प करून ठेवताहेत असं वाटतं. बोट राईड करताना मोठमोठय़ा ब्रिजखालून बोट जशी पार होते तसं आपण काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यात प्रवेश करतोय असा भास होत राहतो. प्रवास सुरू असतानाच गाईड आपल्याला ‘द ग्रेट शिकागो फायर’ची माहिती देण्यास सुरुवात करतो. रविवार, 8 ऑक्टोबर 1871 रोजी रात्री 9 वाजता या शहरात आग लागली. असं म्हणतात, गोठय़ातील गाईचा एका घासलेटच्या कंदिलाला धक्का लागून ही आग लागली. शहरात लाकडी बांधकाम असल्यानं कमी वेळात आग पसरली. इथे प्रचंड वारे वाहत असल्यानं शिकागोची एक ओळख ही ‘विंडी सिटी’ अशीदेखील आहे. वाऱयांनी आग पसरण्यास मदत झाली. अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळाली, पण दुर्दैव असं की, आग विझवायला बंब पाठवले ते उलट दिशेला. म्हणजे ‘आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी’. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. 24 तासांनी रात्री पाऊस पडला त्या वेळी कुठे आग आटोक्यात आली. जवळपास एक लाख लोक यात बेघर झाले होते. जवळपास 17 हजार छोटय़ा-मोठय़ा वास्तूंना भस्मसात करणाऱया याच घटनेची ओळख ‘द ग्रेट शिकागो फायर’ अशी आहे.
आपलं शहर डोळ्यांसमोर राख होताना शिकागोवासीयांनी पाहिलं. उघडे पडलेले संसार, जळून कोळसा झालेली घरं. या सर्व घटनेनंतर निराश, हताश बसून न राहता इथल्या लोकांनी शिकागो शहर पुन्हा उभं करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शहराचा नव्यानं विचार केला आणि पुन्हा शहराची अशी अवस्था होऊ नये अशा प्रकारे नगर रचना करण्याचं निश्चित केलं. शिकागोत काम करणाऱया वास्तुविशारदांनी लाकडाऐवजी स्टीलच्या स्ट्रक्चरचा वापर करून इमारती बांधण्याचं ठरवलं. हा काळ शिकागोच्या पहिल्या आर्थिक सुबत्तेचा काळ ठरला. येथून शिकागोच्या विकासाला नवीन गती मिळाली. त्यांनी शहरात रेल्वेचं जाळं उभं केलं. शहरातील आर्थिक उलाढालीच्या भागाची सीमारेषा निश्चित करण्याच्या उद्देशानं ‘लूप’ रेल्वे सुरू केली. ज्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय शहराच्या कोणत्याही कोपऱयात राहणारे नागरिक इथपर्यंत प्रवास करू शकतात.
आगीच्या घटनेनंतर शहर उभारणी करताना वास्तुविशारदांनी भरीव योगदान दिलं. या वास्तुविशारदांमध्ये हेन्री हॉबसन रिचर्डसन, डँकमार एडलर, डॅनियल बर्नहॅम, विल्यम हॉलाबर्ड, विल्यम लेबरॉन जेनी, मार्टिन रोचे, जॉन रूट, सोलोन एस. बेमन आणि लुई सुलिव्हन यांचा समावेश आहे. यांनी वैशिष्टय़पूर्ण अशा इमारती बांधल्या. 1889-91 च्या काळात ‘मोनाडनोक’ इमारत बांधली. ‘फर्स्ट शिकागो स्कूल’च्या वास्तुविशारदांचे इमारत बांधणीचे वैशिष्टय़ दर्शविणारी ही इमारत 91 फूट उंच आहे. लाकडाचा वापर कमी करून त्यामध्ये स्टील फ्रेमवर इमारती उभ्या करण्यात आल्या होत्या. शिकागोतल्या उंच इमारतींची सुरुवात याच काळात झाली. रिलायन्स बिल्डिंग, मॉर्क्यूट बिल्डिंग, फिशर बिल्डिंग, सुवेलियन सेंटर, शिकागो बिल्डिंग ही यातील काही नावे आहेत. 1958 च्या काळात मात्र याला छेद दिला स्टील कंपनीच्या ‘इनलँड स्टील’ (Inland Steel) इमारतीनं. त्यांनी संपूर्ण स्टील बाहेरून दिसेल अशी इमारत उभी केली. त्याच्या चारही बाजूंना काचा दिसतात. यावर कोणतेही नक्षिकाम दिसत नाही. हे ‘सेकंड शिकागो स्कूल’ म्हणून ओळखले जाते, तर ट्रिब्यून टॉवर हीदेखील शिकागोतील एक वैशिष्टय़पूर्ण आणि प्रसिद्ध इमारत आहे.
1960-70 च्या दशकात काँक्रिटीकरण सुरू झालं आणि त्यातून उभी राहिली ती ‘मरिना सिटी’ इमारत. ही इमारत म्हणजे शहरामध्ये असलेले एक शहर. यात हॉटेल, थिएटर, कार्यालये, रहिवासी घरे… सारे काही होते. आजही ही इमारत डौलानं उभी आहे. आता मरिनामध्ये मुख्यतः रहिवासी घरे आहेत. संपूर्ण काँक्रीटने बनलेली ही जगातील काही महत्त्वाच्या इमारतींपैकी ही एक इमारत आहे. त्याचा फुलासारखा आकार आहे. त्यानंतर 1973 मध्ये आधुनिक इमारतींचा काळ आला. ज्यामध्ये विलिस टॉवर ही शिकागोतील सर्वात उंच इमारत उभी राहिली. बंडल टय़ूब सिस्टमच्या तत्त्वावर ही इमारत तयार करण्यात आली. पहिली 25 वर्षे तर ही जगातील उंच इमारत म्हणून ओळखली गेली. या इमारतीत 103 व्या मजल्यावर स्काय डेक बनवण्यात आला आहे. नजीकच्या काळातील ‘ट्रम्प’ हॉटेलची इमारतदेखील सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. यासोबतच शहरातील रस्ते, रेल्वे, मोठी कार्यालये, थिएटर, शाळा, आर्ट गॅलरी, अद्ययावत आणि अॅलर्ट अग्निशमन दल, मिलेनियम पार्क, आइस स्केटिंग आणि खेळाची मैदाने अशा विविध प्रकारच्या सोयीसुविधांनी सज्ज असं हे शहर. या शहरात देशविदेशातून आलेले असंख्य लोक राहतात. सर्वांना सामावून घेणारं हे शहर आहे. हे सारं पाहताना तास कसा निघून जातो कळत नाही. बोट राईड सुरू करताना सूर्यास्त होत होता. बोट राईड पूर्ण झाली तेव्हा अंधार पडला होता, पण इमारतींच्या लाइट्समुळे शिकागो नदीचे दोन्ही काठ सोनेरी रंगानं उजळून निघाले होते. लखलखाट करणाऱया शहराच्या खाली त्याचा राख झालेला इतिहास दबला होता आणि वर सोनेरी पंख असलेला फिनिक्स भरारी घेत असल्याचा भास होत होता. इथल्या लोकांनी जणू स्वामी विवेकानंदांनी उपनिषदातील सांगितलेला विचार ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका’ आपल्या कृतीत आणला आहे असं जाणवत होतं. तेव्हा शिकागोच्या गल्ल्यांमधून फिरताना जगण्याची नवीन प्रेरणा मिळते. तेव्हा कधी शिकागो पाहायला गेलात तर मरगळ दूर करून फिनिक्स भरारी घ्यायला तयार रहा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List