Pune News सावधान… ब्रँडेडच्या नावाखाली होतेय बनावट वस्तूंची खरेदी, नामांकित कंपन्यांच्या लोगोचा वापर
नागरिकांनो… ब्रँडेड, नामांकित कंपन्यांच्या वस्तू खरेदीच्या नावाखाली तुमच्या घरी बनावट वस्तू येण्याची शक्यता आहे. मोठी रक्कम मोजून तुम्ही खरेदी केलेले कपडे, शूज आणि अगदी शालेय साहित्यदेखील बनावट असल्याचे मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. नामांकित महागड्या कंपन्यांचा लोगो वापरून हे साहित्य बाजारात आणले जाते. मागील तीन दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने असा तब्बल चाळीस ते पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेने कात्रज भागात केलेल्या कारवाईत ‘प्यूमा’ कंपनीचा लोगो वापरून विकल्या जाणाऱ्या शालेय बॅगा, शूज आणि कपडे जप्त केले. तब्बल 8 लाखांचा बनावट माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात ‘प्यूमा’ या नामांकित कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट बॅगा, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, जॅकेट, कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. खऱ्या अर्थाने प्यूमा या कंपनीचे शूज, टी-शर्ट हे अत्यंत महाग आहे. मात्र, त्याचा लोगो वापरून विक्रेते पाचशे-सहाशे रुपयांना ते विकतात. नागरिक देखील स्वस्तात चांगल्या कंपनीची वस्तू मिळत असल्याचे समजून याला बळी पडतात.
…परराज्यातून बनावट साहित्य पुण्यात
एरंडवणा भागात गुन्हे शाखेने कारवाई करून ‘लिवाईस’ या कंपनीचे बनावट कपडे जप्त केले. हे कपडे संबंधित विक्रेत्याने आंध्र प्रदेशातील नेलोर आणि कर्नाटकातील बंगळुरू येथून आणल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नामांकित कंपनीच्या नावे येणाऱ्या बनावट वस्तू या परराज्यातून शहरात येत असल्याचे समोर आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List