स्वयंपाकघर – पदार्थाची चव हीच पोचपावती
>> तुषार प्रीती देशमुख
कोणत्याही पदार्थाला जशी फोडणी महत्त्वाची असते, कारण तीच त्या पदार्थाचा स्वाद वाढवते, तशीच आपल्या आयुष्यातील वाईट दिवस आपल्याला शिकवतात, घडवतात आणि तेच पुढे आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. एकवीरा आई कृपा पोळी भाजी केंद्राच्या सोनालीताई या त्याचेच एक उदाहरण.
परिस्थिती व्यक्तीला घडवते. आपल्यावर आलेल्या वाईट दिवसांशी झगडत न डगमगता लढा दिला तर नक्कीच चांगले दिवस येतात. कोणत्याही पदार्थाला जशी फोडणी महत्त्वाची असते. कारण तीच त्या पदार्थाचा स्वाद वाढवते तशीच आपल्या आयुष्यातील वाईट दिवस आपल्याला शिकवतात, घडवतात आणि तेच पुढे आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे सोनाली अनंत सावंत ताई.
सोनालीताई लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना तीन भावंडे. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या आई सुलोचनाताई यांच्यावर होती. ताईंनी घरकाम करून, प्रचंड मेहनत घेऊन आपल्या मुलांना शिकवले पण सोनालीताईंचे शिक्षणात फार लक्ष लागायचे नाही. कारण आईची मेहनत त्या पाहत होत्या. आपणही नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला पाहिजे, असे त्यांनी ठरवले. त्यानुसार त्यासुद्धा छोटी मोठी घरकामे करू लागल्या. त्यातच त्यांना डॉ. विजया चौधरीताई यांचे घर सांभाळण्याचे काम मिळाले. घर सांभाळण्याचे व घरातली सगळी कामे चोख करण्याची सोनालीताईंची पद्धत पाहून डॉ. विजयाताई त्यांच्यावर खूप खुश असायच्या. त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी सोनालीताईंवर सोपवली. या बंगाली कुटुंबाकडे त्यांनी 14 वर्षे नोकरी केली. बंगाली पद्धतीचे पदार्थ शिकल्या. बंगाली पाककलेची रुची समजली. आपल्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईने घेतलेले कर्ज असो वा कुटुंबावर आलेले आर्थिक संकट असो, सोनालीताईंनी आईला लहानपणापासून आर्थिक हातभार लावला होता.
लग्न झाल्यानंतर सोनालीताइं&नी छोटय़ा मोठय़ा नोकऱया केल्या. मात्र अंकिता व अनिकेत या मुलांच्या संगोपनासाठी त्यांना काही काळासाठी नोकरी सोडावी लागली. त्यांचे पती अनंत सावंत प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होते. आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी सोनालीताईंनी पुन्हा घरगुती जेवणाची कामे घेतली. साडीला फॉल बिडिंग करणे व भाजी-चपाती करण्याचे काम सुरू केले. 2020 साली कोरोनाच्या काळात त्यांनी चपाती विक्रीचा व्यवसाय सुरू केला, ज्याला खूप मागणी असायची. या व्यवसायाला त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना खूप साथ दिली. आईची ही सगळी मेहनत पाहून मुलगा अनिकेत, ज्याने डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूटमधून हॉटेल मॅनेजमेंट केले आहे, त्याने आपल्या आईचा स्वतचा व्यवसाय असावा म्हणून दादर पश्चिम येथे ‘गिरगाव पंच डेपो’समोरील रोडवर जेवणाचा फिरता स्टॉल सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. मैत्रिणीबरोबर सुरू केलेला हा व्यवसाय पुढे माघार न घेता एकटीने चालवण्याचे ठरवले. ‘एकवीरा आई कृपा पोळी भाजी घरगुती जेवण या नावे आपला जेवणाचा व्यवसाय सुरू केला.
दुपारी साडेबारा ते साडेतीन या वेळेत शाकाहारी व मांसाहारी घरगुती रुचकर जेवणाचा आस्वाद त्या अनेक गिऱहाईकांना देत असतात. पहाटे लवकर उठून सगळा स्वयंपाक घरी करून, मग ते डब्यात भरून, ते गाडीवर ठेवून विक्रीच्या ठिकाणी नेण्याचे काम प्रवीणदादा करतो. ताईंना अंकिता व अनिकेत या आपल्या दोन मुलांसोबत व्यवसायासाठी मोलाची साथ लाभली ती त्यांची भाची संजना वाडकर, जी सफाळ्याहून रोज दादरला येते. तसेच त्यांचा भाचा अथर्वही खूप मदत करत असतो. जेवणाने भरलेले भलेमोठे डबे अडीच-तीन तासांत कधी फस्त होतात हे त्यांनाही समजत नाही. अनेकांना जेवण संपलं म्हणून सांगावं लागतं. गिऱहाईक पोटभर जेवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच ताईंसाठी खरी पोचपावती असते. माफक किमतीत पोटभर रुचकर जेवण मिळत असल्यामुळे त्यांच्या या फिरत्या स्टॉलवर गर्दीचा ओघ असतो.
हे सगळे करत असताना मात्र सोनालीताईंनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्या राहत असलेल्या दादर – गणेश पेठ लेनमधील गजानन कृपा या बिल्डिंगमधील प्रत्येक व्यक्तीने त्यांना सहकार्य केले. सोनालीताई आवर्जून सांगतात की, मी आज जे काही आहे ते माझी आई तसेच माझ्या सासूबाई गंगाबाई शांताराम सावंत यांची मिळालेली मोलाची साथ यामुळे आहेत. आज सत्तराव्या वर्षीदेखील त्या मला मदत करत असतात. सोनालीताई म्हणतात की, माझ्या या छोटय़ाशा व्यवसायामुळे मला अनेकांना काम देता आले आणि त्यांचे कुटुंबदेखील त्यामुळे आनंदी आहे. त्यांच्या स्टॉलवर शाकाहारी जेवण तर उत्तम मिळतेच, पण मांसाहारी जेवणामध्ये ताजे मासे असल्यामुळे त्यांच्याकडे खवय्यांची गर्दी होते. आयुष्याला जेव्हा संकटांची फोडणी बसते तेव्हाच आपले आयुष्य रुचकर बनते.
सोनालीताईंसारखे अनेक कुटुंबे आहेत, ज्यांनी कोरोना काळात खाद्य संस्कृतीशी निगडित छोटे-मोठे व्यवसाय केले व कुटुंबाला सावरले. कोरोनाने ताईंसारखे अनेक छोटे उद्योजक घडवले असे आपण नक्कीच म्हटले पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List