‘लाडक्या’ मशिननं मतं नेली, मारकडवाडीतील आजोबा संतापले; थेट मोदींनाच धरलं धारेवर
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूरमधील मारकडवाडी गाव चर्चेत आलं आहे. मारकडवाडीतील जनतेने पुन्हा बॅलेट पेपर मतदान घेण्याची मागणी केल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष तिकडे लागले आहे. मतदान कुठं चोरीला गेलं, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. याबाबत मारकडवाडीतील माजी सरपंच दगडू पराजी मारकर यांच्याशी महाराष्ट्र टाईम्सच्या व्हिडिओ प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मारकर यांनी लाडकी बहीण योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली.
काय म्हणाले आजोबा?
आमची मतं आधीपासूनच मोहिते-पाटील याना मिळत होती. आता त्यांची काही लोकं एकत्र आली आणि त्यांनी आमची मतं सातपुतेंकडे नेली. सातपुते यांनी 17 कोटी रुपये विकास कामांसाठी खर्च केल्याचा दावा केला आहे. त्यांनी कुठे विकास केला? कुठे रस्ते बांधले? कोणता बंधारा बांधला? हे दाखवून द्यावे, असं आव्हान दगडू पराजी मारकर यांनी केलं आहे.
मतदानाच्या दिवशी पहिलं मतदान मीच केलं होतं. मी तुतारीला मत टाकलं होतं, पण कमळाला गेलं, असा आरोप आजोबांनी केला. याबाबत विचारणा केली असता आपलीच चौकशी झाल्याचे ते पुढे म्हणाले. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी बैठक घेऊ दिली नाही. आमच्यावर एट्रोसिटीचे गुन्हे दाखल केले, असे आजोबांनी नमूद केले.
लाडक्या बहिणीवर सडकून टीका
लाडक्या बहिणीने मतं नेली का, असं विचारलं असता आजोबांनी चांगलाच संताप व्यक्त केला. लाडकी बहिण मतं नेते का इतकी.. लाडक्या बहिणीनं नाही लाडक्या मशिननं मतं नेली, अशी प्रतिक्रिया आजोबांनी दिली. तेलाचा दर किती झाला? केळी-सिताफळाचा दर काय? दूधाचा दर कमी केला, केळीचा दर कमी केला, ऊसाला दर नाही, पेट्रोल भरपूर वाढवलं. हे काय करत आहेत मोदी. आम्ही घाम गाळून कष्ट करतोय शेतीत तेव्हा पिकवून खातोय. आम्हाला हरामचं खायची सवय नाही, अशा शब्दात आजोबांनी मोदींचा समाचार घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List