तयार कपड्यांवर आता 18 टक्के जीएसटी! अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी गोरगरीबांच्या पैशांची लूट,राहुल गांधी यांचा बॉम्बगोळा
अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी मोदी सरकार गोरगरीबांच्या पैशांची लूट करीत आहे. ऐन लग्नसराईत आता तयार कपड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात येणार असल्याचा बॉम्बगोळा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टाकला. या जुलमी करवाढीच्या विरोधात आम्ही आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर हा खळबळजनक खुलासा केला आहे. ‘जीएसटी’वर देशभरात असंतोष आहे. छोटय़ा उद्योजकांमध्ये जीएसटीबद्दल प्रचंड रोष असतानाही आता सरकार नवीन कररचना आणणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यासाठी लोक काटकसर करून बचत करतात. मात्र गोरगरिबांच्या याच पैशांवर सरकारचा डोळा असून 1500 रुपयांवरील कपड्यांवर आता 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. ही अन्यायकारक वाढ केवळ अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवू, हा निर्णय बदलण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणू, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
याकडे लक्ष द्या…
.राहुल गांधी यांनी जीएसटी वाढीबरोबरच इतरही महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे.
.रुपया 84.50 एवढय़ा नीचांकी पातळीवर
.बेरोजगारीने 45 वर्षांचा विक्रम मोडला
.कॉर्पोरेट कर 7 टक्क्यांनी घटला, तर आयकर 11 टक्क्यांनी वाढला
.किरकोळ महागाई 6.21 टक्क्यांवर
.कांदे, बटाटय़ाचे भाव 50 टक्क्यांनी वाढले
.परवडणाऱया घरांचा टक्का 38 वरून 22 टक्क्यांवर
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List