टिटवाळ्यात भटक्या कुत्र्यांनी तोडले वृद्धेचे लचके
शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत चांगलीच वाढली असून टिटवाळ्याच्या रिजन्सी सर्वम गृहसंकुलात वृद्ध महिलेचे लचके तोडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहे. या महिलेची ओळख अद्याप पटली नसून ती भिक्षेकरी किंवा कचरावेचक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
टिटवाळा येथील रिजन्सी सर्वम गृहसंकुलात शुक्रवारी मध्यरात्री 60 वर्षांची महिला आली होती. ही वृद्ध महिला गृहसंकुलातील इमारत क्रमांक आठ व नऊच्या मागील बाजूस गेली असता भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला जमिनीवर कोसळली. स्वतःला वाचवण्यासाठी महिलेने भरपूर प्रयत्न केले. मात्र तिला यश आले नाही. एका पाठोपाठ एक कुत्रे महिलेचे लचके तोडत होते. महिला बेशुद्ध झाल्यानंतर श्वानांनी तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान स्थानिक आणि सुरक्षारक्षकाने वेळीच धाव घेऊन श्वानांना पळवून लावले. गंभीर जखमी झालेल्या महिलेला स्थानिकांनी गोवेली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List