“माझा जीव घे पण तिला वाचव..”; पत्नीच्या कॅन्सरबद्दल बोलताना नवज्योत सिंग सिद्धू भावूक
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत सेलिब्रिटी कपल हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे दोघंही उपस्थित होते. हा एपिसोड विनोद आणि विविध गप्पांनी परिपूर्ण होता. पण त्यातील एका सेगमेंटमध्ये सिद्धू त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांच्या पत्नीला जेव्हा कॅन्सरचं निदान झालं, तेव्हा ते तुरुंगात होते. हाच काळ आठवत ते भावनिक झाले होते. 1988 मध्ये रस्त्यावर झालेल्या वादानंतर एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी ते 2022 मध्ये वर्षभर तुरुंगात होते.
आयुष्यातील या कठीण काळाविषयी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, “मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मला असं वाटत होतं की तिला काही झालं तर मी कसा जगणार? तो काळ खूप कठीण होता पण ती खूप स्ट्राँग होती, प्रचंड खंबीर होती. संपूर्ण कुटुंब तिच्या बाजूने उभं होतं. मी देवीजवळ एकच प्रार्थना केली की तू माझा जीव घे पण तिला वाचव. आमची मुलं आणि मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मी इतका बिथरलो होतो. पण ती खूप धाडसी होती. केमोथेरपी सुरू असतानाही तिने तिच्या वेदना बोलून दाखवल्या नाहीत. तिला वेदना व्हायच्या, पण तिच्यापेक्षा 100 पटीने जास्त आम्हाला वेदना व्हायच्या.”
हे ऐकून सिद्धूंची पत्नी म्हणाल्या, “पण जेव्हा रुग्ण स्वत: हसत असेल तर इतर जण काय करू शकतील? मी त्यांना निराश होऊ दिलंच नाही. कारण मी नेहमी त्यांच्यासमोर हसत असायची.” त्यावर सिद्धू म्हणतात, “तुला काय माहीत, तू तर हसत होतीस, पण आम्ही खोलीच्या बाहेर जाऊन रडत होतो.” पत्नीच्या कॅन्सरवरील उपचारानंतर त्यांचं राहणीमान कशा पद्धतीने बदललं, याविषयीही सिद्धूंनी सांगितलं.
“कॅन्सरनंतर तिची लाइफस्टाइल पूर्णपणे बदलली आहे. आधी ती बादलीभर आईस्क्रीम खायची, रात्रभर कुरकुरे खायची. आता प्रत्येक गोष्ट बदलली आहे. दररोज सकाळी ती कडुलिंब, लिंबू, ॲपल सायडर व्हिनेगर पिते. तिने चहा पिणं बंद केलंय. आज चार महिन्यांनंतर मी तिला चहा बनवून दिला. मी हेच सांगू इच्छितो की कॅन्सरवर तुम्ही मात करू शकता. तुम्ही ठरवलंत तर नक्कीच मात करू शकता”, असं सिद्धूंनी सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List