महागाई आणि बेरोजगारीवरून प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला धक्के मारून बाहेर काढले; मुंबईत अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेत राडा
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि तरुण पिढी हैराण झाली आहे. त्याचे पडसाद आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेत उमटले. एका तरुणाने भर पत्रकार परिषदेत शहा यांना महागाई आणि बेरोजगारीवरून जाब विचारला. त्यामुळे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडून अक्षरशŠ धक्के देत बाहेर काढले.
अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईतील सोफिटेल हॉटेल येथे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. संकल्पपत्राचे शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर एक तरुण अचानक उभा राहिला आणि त्याने गॅस सिलिंडरच्या महागाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला. शहा, भाजपचे अन्य नेते आणि पदाधिकाऱयांचे धाबे दणाणले.
संकल्प पत्रात नुसता घोषणांचा पाऊस
महाराष्ट्रासाठी संकल्प पत्राच्या नावाखाली अमित शहा यांनी घोषणांचा पाऊस पाडला. महिला, बेरोजगार, शेतकऱयांना पुन्हा एकदा खोटी स्वप्ने दाखवण्यात आली. गेल्या अडीच वर्षात सत्ता असूनही जी कामे केली नाहीत त्याचेच गाजर पुन्हा दाखवण्यात आले. शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणींना दरमहा 2100, वृद्धांना पेन्शन, 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करू असे हवेत तीर मारण्यात आले. आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील अनेक योजना भाजपने कॉपी पेस्ट केल्या आहेत.
शहा निरुत्तर
तरुणाने विचारलेल्या प्रश्नांपुढे अमित शहा निरुत्तर होऊन पाहत राहिले. त्या तरुणाच्या हातामध्ये एक पत्रकही होते. कानपूरची लाल ईमली मिल मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे बंद पडली. त्यासंदर्भात ते पत्र होते. घोषणाबाजी करणाऱया या तरुणाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमधून ढकलत बाहेर काढले. त्या तरुणाच्या हातात क@मेरा होता आणि तो पत्रकार परिषदेचे शूटिंगही करत होता.
हा तरुण भाजपशासित उत्तर प्रदेशातील कानपूरचा होता. त्याने पत्रक फडकावत वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे वाढते दर आणि बेरोजगारीवरून शहा आणि भाजपला जाब विचारला. त्याच्याकडून प्रश्नांचा भडीमार झाल्याने भाजपवाल्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List