महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरला
महिलाच नव्हे तर युवकांवर देखील अन्याय करणाऱ्या भाजप प्रणित सरकारला पराभूत करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणा. यशोमती ठाकूर सारख्या बुलंद व कणखर नेतृत्वाची समाजाला व पर्यायाने महाराष्ट्राला गरज असून या आपल्या बहिणीला हरविण्यासाठी विरोधक षडयंत्र रचतील परंतु आपण कोणत्याही भ्रमात न राहता यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत पोहचवा असे आवाहन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट यांनी केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार लोकनेत्या यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत आ. विनेश फोगाट बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव,मध्यप्रदेशचे माजी मंत्री सुखदेव पांसे,खा. बळवंत वानखडे,वर्धा येथील खा. अमर काळे, यवतमाळ येथील खा.संजय देशमुख,माजी मंत्री अनिलबाबू देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,आ. धीरज लिंगाडे,बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप दिलीप एडतकर, सुनील देशमुख, विलास इंगोले, बबलू शेखावत,शाम देशमुख, यांची उपस्थिती होती.महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्ते व जनताजनार्दन यांच्यां उपस्थितीत यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदार संघासाठी नामांकन दाखल केले. आ. यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटकपक्षाचे हजारो कार्यकर्ते तिवसा येथील समर्थ आडकूजी महाराज नगर सातरगाव रोड येथील मैदानावर जमले होते.
प्रारंभी नामांकन रॅली काढून यशोमती ठाकूर यांनी अफाट सभा घेतली.मोठ्या शक्तीप्रदर्शनात त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी पुढे बोलतांना विनेश फोगाट म्हणाल्या की,यशोमती ठाकूर या बहादूर बेटी व बहीण आहे. यशोमतींचा आवाज म्हणजे तुमचा आवाज.यशोमती ठाकूर सारख्या महिला निर्माण झाल्यास महिलांवर अत्याचार होणार नाहीत असा विश्वास आ.फोगाट यांनी व्यक्त केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारचा समाचार घेत यशोमती ठाकूर सारख्या जनतेच्या पाठीराख्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी माजी मंत्री सुखदेव पांसे यांनी यशोमती सारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची आज गरज असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी खा.अमर काळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.भाजपा व महायुतीच्या उमेदवारांची लोकसभेत कशी दयनीय अवस्था झाली याची सर्वांनाच कल्पना आहे त्याची धास्ती घेऊन विद्यमान सरकारने अनेक योजनांचे प्रलोभन जनतेला दाखविले. अश्या फोकनाड सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असून आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असा आशावाद महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
तुमची साथ, तुमचा आशीर्वाद हाच माझा विश्वास-यशोमती ठाकूर
तुमचे प्रेम,आशीर्वाद,विश्वास माझी ताकद आहे.कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तुमची साथ पुरेशी आहे. ही लढाई नुसती निवडणूकी पुरती नसून संविधान वाचविण्यासाठी आहे. विद्यमान सरकारने तुमचा विश्वासाघात केला.शेतीमालाला आजही पंधरा वर्षांपूर्वीचेच भाव आहे. फसव्या योजना काढून भाजप प्रणित सरकारने मतदारांना आमिष दाखविले आहे. आपल्याला कोणत्याही प्रलोभनांना बळी पडायचे नाही.पक्ष व घर फोडण्याचे काम करणाऱ्या लोकांना संविधानाची ताकदच येणाऱ्या काळात दाखवावी लागेल यासाठी सजग राहून महाविकास आघाडीला भक्कम साथ द्या. विकास करणाऱ्यांच्या पाठीशी राहा.संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचे आवाहन तिवसा विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केले.
यशोमती ताईंनी नेतृत्व सिद्ध केलं-खा. वानखडे
याप्रसंगी बोलतांना खा. बळवंत वानखडे यांनी म्हटले की, यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणली.त्यांनी विविध विकासकामे करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हे नेतृत्व आपण जपलं पाहिजे असं नेतृत्व लाभण आपल्या जिल्ह्याचे भाग्य आहे आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन यावेळी खा.बळवंत वानखडे यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List