‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन; वयाच्या 35 व्या वर्षी केली आत्महत्या?
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता नितीन चौहानचं निधन झाल्याचं कळतंय. मुंबई गुरुवारी नितीनचं निधन झालं. तो 35 वर्षांचा होता. नितीनने ‘दादागिरी 2’ हा रिअॅलिटी शो जिंकला होता. मूळचा उत्तरप्रदेशमधील अलिगड इथला नितीन हा या शोनंतर प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने विविध मालिका आणि शोजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची, प्रतिभेची चुणूक दाखवली. तो ‘एमटीव्ही स्पिट्सव्हिला 5’मध्येही झळकला होता. त्याचसोबत ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘फ्रेंड्स’ यांसारख्या सीरिजमध्येही त्याने काम केलंय. नितीन 2022 मध्ये शेवटचा एका मालिकेत दिसला होता. सब टीव्हीवरील ‘तेरा यार हूँ मै’ या मालिकेत त्याने काम केलं होतं.
आत्महत्येचा संशय
‘तेरा यार हूँ मै’ या मालिकेतील नितीनचे सहकलाकार सुदीप साहीर आणि सयांतनी घोष यांनी त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र त्याचं निधन कसं आणि कशामुळे झालं, याबाबतची कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही. नितीनची माजी सहकलाकार विभूती ठाकूरने लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र त्याविषयी कोणतीच अधिक माहिती मिळाली नाही. मुलाच्या निधनाबद्दल कळताच नितीनचे वडील मुंबईकडे रवाना झाले आहेत.
टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा
नितीनच्या निधनाबद्दल कळताच टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त करत आहेत. ‘अत्यंत वाईट बातमी आहे ही, अजूनही मला विश्वास होत नाही’, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. नितीनच्या निधनाबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. नितीनच्या निधनानंतर त्याची सहकलाकार विभूती ठाकूरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. नितीनसोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘तुझ्या आत्म्याला शांती मिळो.. तुझ्याबद्दल कळताच मोठा धक्का बसला. अजूनही विश्वास होत नाही.’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List