महाराष्ट्रातील जनतेशी धोकेबाजी केलेल्या खोके व धोके सरकारचे शेवटचे 15 दिवस – पवन खेरा
महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली आहे. भाजपा सरकारचे भ्रष्टाचाराचे विक्रम पाहता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही लाज वाटेल. टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे 15 दिवस राहिले असून 23 तारखेला हे सरकार पायउतार होईल, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवन खेरा म्हणाले की, शिंदे भाजपा सरकारने पुणे रिंग रोड, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, रुग्णवाहिका खरेदी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करुन जनतेचा पैसा लुटला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराची यादी फार मोठी आहे. या सरकारने महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज प्रकल्प यासारखे तब्बल 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असेलले प्रकल्प गुजरात व इतर राज्यात जाऊ दिले. यामुळे महाराष्ट्रातील 10 लाख रोजगार हिरावले व राज्यातील सुशिक्षित तरुण बेरोजगारच राहिले. महाराष्ट्रात तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे, महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही शिंदे भाजपा सरकारची कामगिरी आहे.
भारतीय जनता पक्ष ‘बहुत झुठी पार्टी’ असून या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींपासून खालपर्यंत सर्वच जण सातत्याने खोटे बोलत असतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, एमएसपी लागू करणार अशी आश्वासने दिली. हरियाणा निवडणुकीवेळी 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते पण यातील एकही आश्वासन भाजपाने पूर्ण केले आहे. काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासने दिली त्याची अंमलबजावणीही केलेली आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात ज्या गॅरंटी जाहीर केल्या होत्या त्याची अंमलबजवाणी सुरु आहे. युपीए सरकारने 71 हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी केली होती, काँग्रेस पक्षाने हे करुन दाखवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या 5 गॅरंटी लागू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे पवन खेरा यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणात दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली नाही अशा खोट्या जाहिराती भाजपाने वर्तमानपत्रातून दिल्या आहेत. काँग्रेस विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल केल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही पवन खेरा यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रचार समितीचे अध्यक्ष राज्यसभा खा. चंद्रकांत हंडोरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत, मुंबई काँग्रेसच्या मीडिया प्रभारी चयनिका युनियाल, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, सचिन सावंत, नासीर हुसेन, आकाश जाधव आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List