महायुतीला सापडेना मराठी उमेदवार, भाजपचे सर्वाधिक 18 अमराठी उमेदवार; मिंध्यांचे 7 अमराठी
विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात महायुत़ीकडे मराठी उमेदवारांची वानवा असल्याचे दिसून आले आहे. महायुतीचे 29 अमराठी उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सर्वाधिक म्हणजे 18 उमेदवार अमराठी आहेत. शिवसेना पक्षाने विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी 288 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीने खास करून भाजपने अमराठी उमेदवारांना मोठय़ा प्रमाणावर उमेदवार दिल्याचे दिसून येते.
देशात हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर राजकारण करणाऱया भाजपने यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 18 अमराठी उमेदवार दिले. मराठी उमेदवार न सापडल्याने भाजपने अमराठी उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यात जैन, मारवाडी, गुजराती, अग्रवाल या अल्पसंख्याक समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. मिंधे गटाने सात अमराठी उमेदवारांना तिकीट दिले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर चार अमराठी उमेदवार रिंगणात आहेत.
सर्वच समाजघटकांना सामावून घेणारा अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाने 12 अमराठी उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
मलबार हिलमध्ये शिवसेनेची रणनीती
मलबार हिलमध्ये भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भैरुलाल चौधरी जैन यांना मलबार हिलमधून संधी दिली आहे. मलबार हिल मतदारसंघात जैन, मारवाडी, गुजराती आदी उच्चभ्रू लोकांची व व्यावसायिक, उद्योग जगतातील मंडळी राहतात. त्यामुळे लोढा यांच्याविरोधात शिवसेनेने जैन समाजाचा उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे. तर शिवसेनेने वर्सोवा मतदारसंघाकडून हारून खान यांना उमेदवारी दिली आहे.
– महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 29 अमराठी उमेदवार अमराठी दिले आहेत. महाविकास आघाडीचे 20 अमराठी उमेदवार रिंगणात आहेत.
शिवसेनेचे मराठी उमेदवारांना प्राधान्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठी उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. शिवसेनेने केवळ दोन अमराठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List