महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण आपल्याला बदलायचेय! खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन
‘तुम्ही खरेच बहाद्दर असाल तर ताकदीच्या लोकांशी लढा; पण अजूनही यांना शरद पवार यांची ताकद समजलेली नाही. लढतील, पण दिल्लीच्या तख्तासमोर शरद पवार कधीच वाकणार नाहीत. सशक्त लोकशाहीत विरोधक असलेच पाहिजेत; पण ते दिलदार हवेत,’ असे सांगत, ‘सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले गलिच्छ राजकारण आपल्यालाच बदलायचे आहे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या-खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. दरम्यान, ‘माझी कोणाशीच वैयक्तिक लढाई नाही; पण अविचाराने वर्तणूक करणाऱ्यांच्या विरोधात ती कायमच राहील,’ असेही त्या म्हणाल्या.
अकोले मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमित अशोकराव भांगरे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सायंकाळी उशिरा झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात, शेतकरीनेते दशरथ सावंत, मधुकरराव नवले, डॉ. अजित नवले, कारभारी उगले, लक्ष्मण नवले, बी. जे. देशमुख, शिवाजी नेहे, दादापाटील वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ उपस्थित होते.
अमित भांगरे 27 वर्षांचे आहेत. या वयात माझे वडील शरद पवार विधानसभेत निवडून गेले होते. जोपर्यंत राजकीय पक्षांनी अधिकृतपणे तरुणपिढी पुढे राजकारणात आणली जात नाही, तोपर्यंत पक्ष मोठे होत नाहीत. ज्यांनी तुमच्या विरोधात उमेदवारी घेतली आहे, त्यांनी संगमनेर येथे महिलांसबंधी गलिच्छ व अत्यंत घाणेरडी व्यक्तव्ये केली आहेत. त्यावर भाजपने अजूनही निषेध व्यक्त केलेला नाही. तसा ते करणारही नाहीत. राज्यात सर्वत्र आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे काढत अत्याचार होत आहेत.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दुधाला भाव नाही, याबाबत सत्ताधारी, महायुतीचे सरकार बोलायला तयार नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही, राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही, असा सरकारचा कारभार सुरू आहे. या महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी आणि अकोलेत चांगले बदल घडवून आणण्यासाठीच महाविकास आघाडीने अमित भागरे यांची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पाठीशी ठाम राहा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
आमदार थोरात म्हणाले, हे सरकार खोके सरकार आहे; पण खोके म्हणजे काय ते मला माहीत नाही. पण तुम्हाला (अकोल्याला) मात्र ते नक्कीच माहीत असेल. राज्यातील हे सरकार असंवैधानिक आहे. आपल्याला राज्यात मविआचे सरकार आणण्यासाठी 180 पेक्षा जास्त आमदार निवडून द्यायचे आहेत. यासाठीच अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन थोरात यांनी केले.
‘त्यांना’ कोर्टात खेचणार आहे
‘सुप्रीम कोर्टात आजही राष्ट्रवादीची केस सुरू आहे. येथे येताना रस्त्यात मला जे चिन्ह दिसले, तेथे कंसात ‘न्यायप्रविष्ट’ असे लिहिलेले नव्हते, म्हणून मी त्याचे शूटिंग केले आहे. यावर ‘त्यांना’ न्यायालयात खेचणार आहे,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List