Assembly election 2024 – खडकवासलात नाराजीचा फायदा कोणाला?
लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी 65 हजार मतांचे मताधिक्य विजयी उमेदवाराला देणाऱ्या खडकवासला मतदारसंघात विधानसभेला अगदी अडीच ते तीन हजारांपर्यंत तफावत दाखवणाऱ्या मतदारसंघाचे नेहमी वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पुणे कॅण्टोन्मेंट आणि मुळशी या दोन मतदारसंघांचे विभाजन होऊन तयार झालेला खडकवासला मतदारसंघ मूळचा शिवसेना विचाराचा. जागा वाटपामध्ये तो भाजपकडे गेला. 2009 मध्ये गोल्डमॅन रमेश वांजळे यांनी मनसेतर्फे 22 हजार मतांचे मताधिक्य घेऊन जिंकला, त्यानंतर तो चर्चेत आला.
रमेश वांजळे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर यांना निसटता विजय मिळाला. ती दोन वर्षे त्यानंतर पुढे दोन वेळा तापकीर येथून निवडून आले. मात्र 2019 ला त्यांना तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्याबरोबर काट्याची लढत द्यावी लागली. अगदी अडीच तीन हजार मतांच्या फरकाने तापकीर निवडून आले.
यावेळी 5 लाख 46 हजार मतदार या ठिकाणी आहेत. 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके, भाजपचे भीमराव तापकीर आणि मनसेचे मयूरेश रमेश वांजळे यांच्यामध्ये आहे. विद्यमान आमदार असूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामुळे भाजपकडून तापकीर यांच्या उमेदवाराची घोषणा अखेरच्या टप्प्यात करण्यात आली. अडीच वेळा आमदार असल्याने काहीशी नकारात्मकता त्यांच्याबद्दल आहे. तर दोडके यांचा गेल्यावेळी थोड्या मताने पराभव झाल्यामुळे ते यावेळी तयारीत उतरले आहेत. पक्षांतर्गत नाराजी त्यांना त्रास देत आहे. मनसेचे मयूरेश वांजळे हे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव आहेत. तरुण आणि उच्चशिक्षित नवा चेहरा म्हणून ते निवडणुकीत उतरले आहेत.
80 टक्के शहरी भाग, रामनगर, राजीव गांधीनगर सारख्या मोठ्या झोपडपट्ट्या आणि उर्वरित ग्रामीण क्षेत्र असा मतदारसंघ असलेल्या खडकवासलामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आहे. जागा वाटपामध्ये ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला गेली. मतदारसंघातील राजकीय गणिते मात्र विस्कटलेली दिसतात. इच्छुक आणि पक्षांमधील आजी-माजी नगरसेवक यांची भूमिका आजही स्पष्ट झालेली नाही. कोण कोणाचे काम करणार आणि कोण कोणाला पाडणार याची चर्चा मतदारसंघात आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे अंतर्गत धुसफूस क्षमविण्यात नेत्यांना यश येणार का? नाराजीचा नेमका फायदा कोणाला होणार यावर निवडणुकीतील विजयाची गणिते अवलंबून आहेत. खडकवासला मतदारसंघात मतदारांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्षात मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांबरोबरच सातारा, सांगली आणि काही प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशांची संख्या मोठी आहे. मतदानासाठी हा वर्ग त्यांच्या मूळ तालुक्यामध्ये निघून जातो, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. या खेपेलादेखील हा परिणाम होणार आहे.
पराती जाड; घमेली निघाली हलकी
खडकवासला मतदारसंघात एका उमेदवाराने पराती, तर एकाने घमेली वाटल्याची चर्चा आहे. एका पैलवान उमेदवाराने भारदस्त पराती वाटल्या, तर दुसऱ्या एका उमेदवाराने घमेली वाटल्याची खमंग चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळाली. मात्र, यामध्ये घमेली हलकी तर पराती भारदस्त असल्याची तुलनात्मक चर्चा मतदारसंघात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List