सगळ्यांचं वय बघता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे; अजित पवार पुन्हा बोलले
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. महाराष्ट्र कायमच देशाला दिशा दाखवत आलेला आहे. त्यामुळे इथे काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अनेक चुरशीच्या लढतीही पहायला मिळणार आहेत. यातीलच एक बारामतीत होत आहे. बारामतीमध्ये काका-पुतण्यामध्ये थेट सामना होणार आहे.
बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता विधानसभेला त्यांच्यापुढे पुतण्या युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. युगेंद्र पवार यांच्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे असून सभांवर सभा घेत आहेत. त्यामुळे अजित पवारांना ही निवडणूक जड जाण्याचीच चिन्हे आहेत. अशातच अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचे वय काढले आहे. बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचे आहे, असे विधान त्यांनी केले आहे.
अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात घेतलेल्या सभेमध्ये शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला. पवार साहेबांचे भाषण ऐकले, त्यावेळी ते म्हणाले की दीड वर्षांनी मी थांबणार आहे. साहेब रिटायर झाल्यावर दीड वर्षांनी तुमच्याकडे कोण बघु शकते. नवखा बघू शकतो का? त्याला यातले काही माहिती आहे का? असे अजित पवार युगेंद्र पवार यांचा उल्लेख न करता म्हणाले.
सगळ्यांच्या वयाचा विचार करता मलाच आता बारामतीचे सगळे बघावे लागणार आहे. साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे नातवाकडे लक्ष द्या असे सांगितले जात आहे. पोरगा सोडला आणि नातूच पुढे केला. मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेले आहे, असा सवालही अजित पवार यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List