तुमची हुकूमशाही गाडायला आम्ही एकत्र आलोय, आम्हाला शिवशाही हवी; उद्धव ठाकरे कडाडले

तुमची हुकूमशाही गाडायला आम्ही एकत्र आलोय, आम्हाला शिवशाही हवी; उद्धव ठाकरे कडाडले

”आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वला नाही. त्यांचं अजूनही तेच सुरू आहे, हे काँग्रेससोबत गेले. हो आहे, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत. कारण तुमची हुकूमशाही गाडायला आम्ही एकत्र आलोत. आम्हाला हुकूमशाही नको, आम्हाला शिवशाही हवी, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही काँग्रेसोबत गेलो तर लगेच आम्ही हिंदुत्व सोडलं”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आज कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना त्यांनी मोदी आणि शहांवर हल्लाबोल केला आहे.

लोकसभेत आपण थोडे कमी पडलो. कोकणातला पराभव माझ्या हृदयाला चटका लावून गेला. कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण. हे नातं कोणी तोडू शकलं नाही. मला खात्री आहे हे नातं आताही कोणी तोडू शकणार नाही. आपलं नातं असं आहे, जेव्हा कोकणावर संकट आलं आहे, तेव्हा शिवसेना धावून येते आणि जेव्हा शिवसेनेवर संकट येतं, तेव्हा कोकण मागे ठामपणे उभं राहतं. आपली शिवसेना मोदी आणि शहा संपवायला निघालेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जेव्हा भाजपला कोणीही ओळखत नव्हते, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी ठरवलं असतं की, युती मला नको. काय व्हायचं ते माझ्या एकट्याच होईल, तर भाजप आज औषधालाही महाराष्ट्रात दिसली नसती, इतकी शिवसेनेची ताकद होती आणि आहे. मात्र आपलं नातं, हिंदुत्व, देश आणि महाराष्ट्रासाठी त्यांना (भाजप) सोबत घेतलं मात्र हे इतके गद्दार निघाले की, स्वतःच काम झाल्यानंतर आपल्याला वापरून फेकून देत आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

”मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. यातच पत्रकारांनी मला निवडणुकीबद्दल विचारलं तुम्हाला काय वाटत? मी त्यांना सांगितलं, या विधानसभेचं असं वैशिष्ट्य आहे की, जशी एका लोकसभा मतदारसंघात माझी प्रचंड मोठी सभा होत होती, तशीच आता एका विधानसभेतही होत आहे. कालच्या बार्शीच्या सभेत स्टेजवरून गर्दीचा काही अंदाज येत नव्हता. मग सभेला जमलेल्या लोकांना मोबाईलचे टॉर्च लावा असं सांगितलं. तेव्हा कळलं ही गर्दी कुठपर्यंत गेली आहे. ते फक्त मोबाईलचे टॉर्च नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या पेटलेल्या मशाली आहेत”, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, ” इथून मला आव्हान देण्यात आलं की हेलिकॉप्टर ऐवजी रस्त्याने येऊन आणि जाऊन दाखवा. मी त्यांना सांगतोय, नशिबाने दिलं आहे, घरी बसून नीट खा, उगाच मध्ये आलात तर, वेडंवाकडं होऊन खाण्यात काहीच अर्थ नाही. कारण आडवे आलात, तर आडवंच करू. तेवढी ताकद, हिंमत ही शिवसेनेत आहेत. मोदीजी तुम्ही येथे या, असं आव्हान मी चॅनलच्या माध्यमातून देत आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही (मोदी ) परिवारवाद, घराणेशाहीवरुन कंठशोष करत होता. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पुत्राला शिवसेना दिली, तर मोदीजी तुमचं काय जातंय. कोण आहात तुम्ही? हा पक्ष माझ्या वडिलांनी स्थापन केला. तेव्हा तुम्ही कुठे होतात. मुंबईत जेव्हा मराठी माणसावर अन्याय होत होता, तेव्हा भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी म्हणून शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. याचेच नेतृत्व शिवसैनिकांनी मला दिलं असेल आणि शिवसेनाप्रमुखांनी याला संमती दिली असेल तर तुम्ही चोमडेपणा करणारे कोण? तुम्हाला शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही चालत नाही. मग इथे तुम्ही जे काही करत आहेत, बाप डोक्यावर आणि पोरं खांद्यावर, याला तुम्ही काय म्हणणार?”

अमित शहांनी माझं नाव घेऊन म्हटलं की उद्धवजी ज्यांनी 370 कलम काढण्याला विरोध केला आज त्याच काँग्रेससोबत तुम्ही बसला आहात. मला त्यांना सांगायचे आहे, अमित शहाजी 370 कलम काढताना शिवसेनेने तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला होता. हे कलम रद्द केल्याबद्दल तेव्हा आणि आजही मी तुमचं कौतुक करतो. 370 कलम हटवणं हे काश्मीर आणि देशासाठी महत्त्वाचं आहेच. कश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग्य आहे. मात्र 370 काढलं, याचं कौतुक तुम्ही कोकणात येऊन काय सांगताय. मी मराठवाडा, विदर्भात फिरलोय. शेतकरी संतापले आहेत. कारण कापूस, सोयाबीनला भाव नाही आहे. संपूर्ण वाताहत झाली आहे. शेतकरी तुमच्याकडे आशेने बघत आहे की, तुम्ही काहीतरी द्याल. मात्र तुम्ही आयात- निर्यात धोरणे अशी आखत आहात की, कांद्याचे भाव पडायला लागलेयत. शेतकरी सोयाबीनला हमीभाव मिळण्याची वाट बघतोय. मात्र आज मी शेतकऱ्यांना सांगत आहे की, तुम्ही सोयाबीन विकण्याची घाई करू नका, आपलं सरकार येतंय. आपलं सरकार आपल्यानंतर हमीभावाने आपलं शासन सोयाबीन खरेदी करेल, असं वचन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत
असे म्हटले जाते की जगात सात लोकं एकसारखी दिसतात. अभिनेत्रींमध्येही असं पाहायला मिळतं एका अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या किंवा थोड्याफार प्रमाणात साम्य...
… संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू – राहुल गांधी
… हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी-शहा यांनी चोरलेला बाण; कैलास पाटील यांचा हल्लाबोल
एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरे कडाडले
महाराष्ट्र सरकार शेतकरीविरोधी, भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा! नाना पटोले
Video – चिमुकल्याच्या घोषणांनी उद्धव ठाकरे भारावले; जाहीर सभेत सत्कार
मिशी लावून कोणी पृथ्वीराज चौहान होऊ शकत नाही, मुकेश खन्ना यांचा अक्षय कुमारला टोला