ज्यांनी तालुक्याला त्रास दिला त्यांना माफी नाही! शक्तिप्रदर्शन करीत आमदार थोरात यांचा अर्ज दाखल
धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांचा अपमान होत असताना तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहात. मागील अडीच वर्षांत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला. गोरगरीब आणि मजुरांच्या अन्नात माती कालवली. तालुक्याला त्रास देणाऱ्यांना माफी नाही असे सांगत दहशतवादी प्रवृत्ती रोखण्यासाठी उमेदवार कोण हे न पाहता त्याच्या मागची प्रवृत्तीला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
जाणता राजा मैदान येथे काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने नवव्या वेळेस उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, डॉ. जयश्री थोरात, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, बाळासाहेब गायकवाड, दुर्गा तांबे, संजय फड, दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, विश्वास मुर्तडक, दिलीपराव पुंड, अशोक सातपुते उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी राज्यात तोडफोड करून आलेले बेकायदेशीर सरकार आणि त्यानंतर राज्यात बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, हिट ऍण्ड रन असे सगळे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहेत. सध्या खालवलेली राजकारणाची पातळी अत्यंत वाईट आहे. अडीच वर्षांपासून सत्ताधाऱयांनी तालुक्यातील विविध नागरिकांवर खोटय़ा केसेस टाकल्या. तालुक्यात सुमारे एक हजार कोटींचे दंड झाले. खडीकरण विकास कामे बंद करून अनेक मजूर व गोरगरिबांच्या अन्नात माती कालवण्याचे काम त्यांनी केले. अनेकांना त्रास दिला; पण त्रास देणाऱयांना आता माफी मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील वाळूचे धोरण फसले आहे. वाळू माफिया मोठे केले गेले आहेत. राहत्यामध्ये इतकी दहशत आहे की कोणी विरोधी बोलले की त्यांच्या तंगडय़ा मोडल्या जातात. तीच लोकं इकडे येऊन भाषण करत आहेत. महिलांचा अपमान करणारी वक्तव्य केली. त्यामुळे संगमनेर तालुका पेटून उठला. जिच्यावर अन्याय झाला तिच्यावरच गुन्हे दाखल झाले. प्रशासनाने असे वागायला नको आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
मुख्य खबऱया हा उमेदवार; मात्र त्याच्या मागे विखे परिवार
या निवडणुकीमध्ये उमेदवार हा मुख्य खबऱया आहे. मात्र, त्याच्या मागे विखे परिवार आहे. हा खबऱया आता जनतेच्या कचाटय़ात सापडला आहे. त्याचा बंदोबस्त मतदान पेटीतून कराच; पण याचबरोबर राहता तालुक्यातही आपल्या सर्वांना काम करायचे आहे. तेथील जनतेलाही दहशतमुक्त करून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे असल्याने राहता, संगमनेर, श्रीरामपूरसह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार थोरात यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List