दिवाळीत किती वाजेपर्यंत फटाके फोडता येणार? पालिकेकडून नियमावली जारी, नियम मोडल्यास…
Diwali 2024 Celebrations : दिवाळी म्हटलं की आपल्यासमोर दिवे, पणती, आकाशकंदील, ठिकठिकाणी केलेली रोषणाई या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्यासोबतच दिवाळी म्हटल्यावर फटाक्यांची आतेषबाजी तर आलीच… मात्र गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडण्यावरुन बराच वाद सुरु आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायुप्रदूषणही होते. यामुळे फटाके फोडण्यावर बंदी घालावी, अशी मागणी वारंवार केली जाते. त्यातच फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.
रात्री १० पर्यंतच फटाके वाजवण्यास परवानगी
मुंबई महापालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. यंदा मुंबईकरांनी दिवाळी अधिकाधिक पर्यावरणपूरक साजरी करावी. तसेच ध्वनीविरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य देत कमीतकमी वायू व ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. तसेच मुंबईकरांनी रात्री १० पर्यंतच फटाके वाजवावे, त्यानंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायुप्रदूषणही होते. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने यावेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच त्रास होतो. तसेच पर्यावरणाचेही नुकसान होते. यंदा प्रदूषण होऊ नये याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबई महापालिकेची दिवाळीसाठी नियमावली
रात्री १० पर्यंत फटाके फोडण्यासाठी परवानगी
ध्वनिविरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे
कमीत कमी वायुप्रदूषण करणारे फटाके फोडावेत
ज्येष्ठ नागरिक आणि हृदयरुग्णांप्रती जबाबदारी जाणून तीव्र आवाजाचे फटाके फोडणे टाळावे
फटाके फोडताना शक्यतो सुती कपडे परिधान करावेत. सैल कपडे वापरू नयेत
फटाके मोकळ्या जागी फोडावेत
फटाके फोडताना सुरक्षेचा भाग म्हणून पाण्याने भरलेली बादली, वाळू इत्यादी बाबी जवळ बाळगाव्यात.
फटाके फोडताना वाळलेली पाने, कागद किंवा कोणतीही इतर सामग्री जाळू नये.
फटाके फोडताना फुलबाजी किंवा अगरबत्तीचा वापर करा
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List