सामना दिवाळी अंकातूनही उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहे. त्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप-प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. यावेळी सामनाचा दिवाळी अंक आला आहे. या दिवाळी अंकातूनही शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. वयाची ७५ वर्ष पूर्ण केल्यावर मोदी निवृत्त होतील का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी दिवाळी अंकाच्या मनोगतातून विचारला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले आहे ?
महाराष्ट्र लुटणाऱ्या मिंधे आणि त्यांच्या दिल्लीतील ‘शाहयां’चा पराभव करावाच लागेल – उद्धव ठाकरे
दिवाळी आनंदात साजरी करायची की अंधारात, हे यापुढे श्रीमंत अदानी महाराज ठरवतील. कारण मोदी-शहा आल्यापासून सर्व प्रकारच्या लक्ष्मीपूजनाचा मान फक्त त्यांनाच मिळत आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत आणि सुजलाम् सुफलाम् राज्य दिवाळखोरीत गेले. त्यामुळे घराघरांत दिवाळी साजरी होत आहे ती कर्ज काढून.
मोदी १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षाचे होतील व ते ठरल्याप्रमाणे निवृत्त होतील अशी वेडी आशा काही देशभक्तांनी धरली आहे. त्यामुळे मोदी गेलेच तर पंत जाऊन कोणते राव त्या पदावर चढतील व देशाला हुकूमशाहीच्या जाचातून मुक्त करतील तेच पाहायचे आहे.
लोकसभा निवडणुकांत जनतेने मोदींचे विमान जमिनीवर आणले. चारशे पार जागा जिंकून देशाचे संविधान बदलण्याचा त्यांचा इरादा होता. चारशे पार या अहंकाराच्या फुग्यास टाचणी लावली ती महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी. या दोन्ही राज्यांतील जनता शहाणपणाने वागली व त्याच शहाणपणाने मतदान करून मोदींच्या बहुमताचा घोडा अडवला. मोदी यांनी सत्ता स्थापन केली, पण दोन ‘सेक्युलर’ म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या कुबड्यांवर ते राज्य करीत आहेत.
मोदींसारख्या विश्वगुरूने कुबड्यांचा आधार घेत राज्य करणे त्यांच्या इभ्रतीस शोभत नाही. पण सेक्युलर कुबड्यांवर लटकत त्यांच्या हिंदुत्वाच्या गर्जना सुरूच आहेत. पंतप्रधान हे एका जातीधर्माचे नसतात. ते देशाचे व अखिल समाजाचे असतात. पण हिंदू-मुसलमानांत फूट पाडून गोंधळ निर्माण करणे हा देशाच्या पंतप्रधानांचा आवडता छंदच बनला आहे.
मोदी हे जर हिटलरचा मार्ग स्वीकारत असतील तर त्यांना तेही धडपणे जमलेले नाही. फार थोड्या वर्षांत हिटलरने जर्मनीला अफाट सामर्थ्य दिले. त्याची कर्तबगारी विलक्षण होती! पण हिटलरला एक गोष्ट कधीच समजली नाही. कुठे थांबावे ते त्याला समजले नाही! त्यामुळे त्याने स्वतः बरोबर जगाचाही विध्वंस करून घेतला. माणसाचे मोजमाप त्याच्या उद्दिष्टावरून आणि कर्तबगारीवरून केले जाते.
‘चारशे पार’ च्या वखवखत्या दौडबाजीस महाराष्ट्राने लगाम घातला. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आला. आता विधानसभा निवडणुकांचे मैदान जवळच आहे. हे मैदान मारून महाराष्ट्र लुटणाऱ्या मिंधे व त्यांच्या दिल्लीतील ‘शाह्यां’ चा पराभव करावाच लागेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List