कर्नाटकातून पुण्यात येणारा एक कोटींचा गुटखा पकडला
पुणे शहरात खुलेआम गुटख्याची विक्री आणि वाहतूक होत असल्याचे वारंवार समोर येत असतानाच आता पुण्याच्या वेशीवर म्हणजेच खेड शिवापूर टोलनाका परिसरात ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तब्बल 1 कोटी 15 लाख 88 हजारांचा गुटखा जप्त केला. एका टेम्पोतून हा गुटखा कर्नाटक येथून पुण्यामध्ये येत होता. त्यापूर्वीच राजगड पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली आहे.
मल्लमा भिमाया दौडमनी (वय 31, सध्या रा. कात्रज, मुळ, रा. मदगुनकी कर्नाटक), तुषार दिपक घोरपडे (वय 26, रा. जाभुळवाडी, हवेली) अशी अटक केलेल्यांची नवे आहेत. त्यांचे साथीदार स्वप्रील भालशंकर, बबलु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यातील कर्मचारी अक्षय सुभाष नलावडे यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाका परिसरातील शिवरे गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. असे असले तरी पुण्यात गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील अनेक कारवायांमधून हे अधोरेखित झाले आहे. शहरातील छोट्या मोठ्या टपऱ्यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध होतो. दरम्यान, रविवारी सकाळी सातारा पुणे महामार्गावर गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पथकाने शिवरे भागात सापळा रचून साताऱ्याहून पुण्याकडे येणारा टेम्पो पकडला. त्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये गुटख्याचा तब्बल 1 कोटी 15 लाखांचा साठा आढळून आला. पोलिसांनी चालकासह दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत हा गुटखा त्यांनी कर्नाटकमधून आणल्याचे समोर आले आहे. पुण्यातील आरोपींचे साथीदार बबलू, स्वप्नील यांच्याकडे हा साठा सोपविण्यात येणार होता. मात्र, यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली. राजगड पोलीस पुढील तपास करत आहेत.
… शहरात सर्रासपणे गुटखा विक्री
शहरात अवैध व्यवसायासह गुटखा विक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही शहरात गुटखा वाहतूक आणि विक्रेत्यांचे हे रॅकेट खुलेआम सुरू आहे. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेची पथके वॉच ठेवून असताना हे प्रकार नक्की कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List