पक्ष काढला मी, वाढवला मी, पण काही लोकांनी कब्जा केला – शरद पवार
‘पक्ष काढला मी, वाढवला मी, पण काही लोकांनी त्यावर कब्जा केला,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली. ‘बारामतीत मी शेती, दुधाच्या संबंधित कारखाने, कंपन्या आणल्या. मी दारूचा कारखाना आणला नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ‘आज नरेंद्र मोदींच्या राजवटीत महाराष्ट्रातील उद्योग पळवले जातायत,’ अशा शब्दांत शरद पवारांनी केंद्रातील भाजपप्रणीत सरकारलाही लक्ष्य केले.
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज दाखल केल्यावर झालेल्या भाषणात भावनिक आवाहन केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ कण्हेरी येथे आयोजित प्रचार सभेत शरद पवार यांनी अजित पवारांचा जोरदार समाचार घेतला. ‘कुटुंबातील वडीलधारी म्हणून कुटुंबात माझे सगळे ऐकतात. मी नेहमीच घर कसे एकत्र राहील हे पाहिले. घर पह्डण्याचे पाप मी करणार नाही,’ असेही शरद पवार म्हणाले.
टाटा-एअरबस, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले
काल गुजरातमध्ये टाटा एअरबस प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पही महाराष्ट्रात उभा केला जाणार होता. परंतु मोदींच्या राजवटीत महाराष्ट्रातील उद्योग पळवले जात आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला.
1972 ला मी विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. आप्पासाहेब पवार यांनी संस्थांचे काम सांभाळले. आता राजेंद्र पवार उत्तम पद्धतीने संस्था सांभाळत आहेत. बारामतीसह जेजुरी, इंदापूरला एमआयडीसी आणली. डायनामिक्स डेअरीचे चॉकलेट जगभर ‘मेड इन बारामती’ म्हणून पोहोचले. आमचा गडी फॉरेनचा माल इथे आणतोय. आम्ही दारूचा कारखाना काढला नाही,’ या शब्दात त्यांनी अजित पवार यांच्यावर घणाघात केला.
‘काही लोकांनी असले उद्योग वाढविण्यासाठी सत्ता वापरली. बारामतीत ‘मलिदा गँग’चा वारंवार उल्लेख होतो आहे. पण मी अशा ‘गँग’ कधी निर्माण केल्या नाहीत,’ असा चिमटा शरद पवार यांनी काढला.
‘बारामती पॅटर्न’ हा मनमोहन सिंगांचा शब्द
बारामती पॅटर्न आज देशभर सांगितला जातो. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशाच्या सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी संबोधित करताना राज्याची प्रगती करायची असेल, तर ‘बारामती पॅटर्न’ स्वीकारा, तुमचे राज्य प्रगतिपथावर जाईल असे सांगितले होते. तेथून ‘बारामती पॅटर्न’ देशपातळीवर पोहोचल्याचे शरद पवार म्हणाले.
अजित पवारांची डोळे पुसण्याची केली नक्कल
अजित पवार सोमवारी बारामतीत बोलताना भावुक झाले होते. पवारांनी त्यावरून त्यांची खिल्ली उडवली. भाषणात शरद पवार म्हणाले, ‘‘सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. सुनेत्रा त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. त्या वेळची अजित पवारांची भाषणे बघा.’’ ते म्हणाले होते, ‘‘समोरचे लोक भावनेला हात घालतील. तुम्हाला भावनाप्रधान करतील. डोळ्यात पाणी आणून मते द्या म्हणतील; पण तुम्ही बळी पडू नका. पण कालच्या सभेत त्यांनी डोळे पुसले,’’ असे सांगत शरद पवार यांनी खिशातून रुमाल काढला व चश्मा उतरवून डोळे पुसले. अजित पवारांची ही नक्कल पाहून सभेत एकच हंशा उसळला. आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिला नव्हतो. ती वेळ त्यांनी आणली. केंद्रात त्यांची सत्ता होती. कोर्टानेही पक्ष व चिन्ह त्यांचे असल्याचे सांगितले. ही मोठी गमतीची गोष्ट घडली. माझा पक्ष पळवला, चिन्ह पळवले, पण मी हार मानली नाही. जनतेच्या आग्रहाखातर पुन्हा उभा ठाकलो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List