हिमाचल प्रदेशात कार दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एक भयंकर अपघात झाला आहे. एका लग्न समारंभातून परतत असताना चौहरघाटी येथील वर्धन येथे एक कार खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला. कारमधील सर्व तरुण धमचाण गावातील रहिवासी आहेत. मात्र या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रविवारी त्या परिसरातील एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चरायला घेऊन जात होता. यावेळी त्याला 700 मीटर खोल दरीत पडलेली कार दिसली. या अपघाताबाबत मेंढपाळाने आजूबाजूच्या ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर पंचायत प्रतिनिधींनी तिक्कण पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. यानंतर पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या मृतदेहांचा पंचनामा करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील असे पोलिसांनी सांगितले.
जेश, गंगू, कर्ण, सागर आणि अजय अशी या मृतांची नावे आहेत. ज्यामध्ये एक 16 वर्षांचा तरुण असून इतर चार जणांचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघातामागील कारणांचा शोध घेत आहेत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण चौहार परिसरात शोककळा पसरली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List