तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय; पण हिंदुत्ववादी कार्यकर्ता नकोय; शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा भाजपला घरचा आहेर
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप शहराध्यक्षांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण 30 वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय,’ अशा शब्दांत घाटे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. घाटे यांच्या पाठोपाठ कुणाल टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून शहराध्यक्ष धीरज घाटे, कुणाल टिळक आणि हेमंत रासने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. धीरज घाटे यांना उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली होती. कसबा विधानसभेच्या जागेसाठी पुण्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धीरज घाटे यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. पोटनिवडणुकीत हातातून निसटलेला आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपा पुन्हा एकदा खेचून आणू शकतो, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्यासमोर बोलून दाखवला होता. मात्र, हेमंत रासने यांची कसबा विधानसभा मतदारसंघाचा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपमध्ये नाराजीचा सुरू उमटला. घाटे, टिळक यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला.
धीरज घाटे यांनी फेसबुकवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. ‘तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय’, अशी पोस्ट घाटे यांनी केली आहे. त्यामुळे आता शहराध्यक्ष घाटे काय भूमिका घेणार, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.
भाजप टिळकांनाही विसरली काय? नेत्यांना जाब विचारणार- कुणाल टिळक
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. कुणाल टिळक म्हणाले, “आईने पक्षनिष्ठेचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्राला दिलं, तेच पार्टी आता विसरली की काय? आणि टिळकांनाही विसरली काय असा प्रश्न पडतो. जरी उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी पक्षाशी एकनिष्ठ राहीन. मात्र, माझ्या वरिष्ठ नेत्यांना जाब विचारणार की आम्ही कुठे चुकलो? पिंपरी-चिंचवडमध्ये जगतापांच्या कुटुंबाला एक न्याय आणि टिळकांच्या कुटुंबाला वेगळा न्याय असं का? असा सवाल कुणाल टिळक यांनी केला. गेले दीड वर्ष संपूर्ण कसबा विधानसभा मतदारसंघात लोकांची कामे केली आणि या वेळेस संधी मिळाली असती तर नक्कीच विजय झाला असता,” असेही कुणाल टिळक यांनी नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List