मैत्रीपूर्ण लढत हा शाप; महाविकास आघाडीला ही लागण लावायची नाही! – संजय राऊत
मैत्रीपूर्ण लढत हा शाप आहे. महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारच्या लढती आम्ही टाळण्याचा प्रयत्न करू. आम्हाला ही लागण लावायची नाही. शिवसेना असो किंवा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, आम्हाला अशा प्रकारे कोणतीही पावले उचलायची नाहीत, असे रोखठोक मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईमध्ये काही ठिकाणी महायुतीतील एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अणुशक्तीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटानेही उमेदवार दिला आहे. वांद्रे पूर्वमध्ये आणि महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणीही असेच झाले आहे. हा त्यांचा प्रश्न असून आम्हाला ही लागण लावायची नाही.
शिवसेना हा आघाडी धर्माचे पालन करणारा पक्ष आहे. आजही आम्ही जिथे समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत तिथे अर्ज भरलेला नाही. सपाने शिवसेनेच्या जागा जाहीर झाल्या तिथे अर्ज भरला आहे. पण आमची भूमिका समन्वयाची राहील आणि आहे. सपा, शेकाप हा आमचा मित्रपक्ष आहे. शेकापसाठी शिवसेनेच्या कोट्यातील रायगड जिल्ह्यातील दोन-तीन जागा सोडायलाही आम्ही तयार आहोत, असेही राऊत म्हणाले.
काँग्रेस आणि आमच्यामध्ये काहीही टोकाचे मतभेद नाहीत, असेही राऊत म्हणाले. आघाडीत किंवा कोणत्याही युतीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरू असते. याचा अर्थ असा नाही की आमचे काही बिनसले आहे. विदर्भातील नाना गावंडे यांच्याशी माझी चर्चा झाली असून दक्षिण सोलापूरचा विषय आम्ही मिटवलेला आहे. इतर ठिकाणी सुद्धा समन्वयाच्या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत, असेही राऊत म्हणाले.
मार्क माय वर्ड! 26 तारखेनंतर शिंदे आणि त्यांचे लोक वनगांसारखे रडताना दिसतील; संजय राऊत यांचा घणाघात
दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे अमर पाटीलच असतील. काँग्रेसच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा एबी फॉर्म दिलेला नाही किंवा दिला जाणार नाही. त्यानंतर इतर ठिकाणीही काही लोकांनी अर्ज भरले आहेत. पण त्या-त्या पक्षाची त्यांना मान्यता नाही. मिरजमध्ये शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असतील. त्यांच्यासाठी काँग्रेस पूर्णपणे काम करेल असे आश्वासन आम्हाला मिळाले आहे, असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List