उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर
उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या या समस्या, विशेषतः डिहायड्रेशन टाळण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात कांजी पेयांचा समावेश केल्यास उन्हाळ्यात शरीर हेल्दी ठेवण्यास देखील मदत होते.
अशातच आजकाल बीटरूट कांजीचे विविध प्रकार, विशेषतः बीटरूट आणि गाजर कांजी सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड होत आहेत. पण त्याचप्रमाणे तुम्ही उन्हाळ्यात अनेक गोष्टींपासून कांजी बनवू शकता. जे उन्हाळ्यात पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात…
काकडीची कांजी
उन्हाळ्यात काकडीची कांजीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे काकडीची कांजी करून प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय काकडी पचनासाठी देखील फायदेशीर आहे. हे करण्यासाठी, काकडी सोलून त्याचे लांब तुकडे करा आणि काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा. आता त्यात मिरची पावडर, मोहरी पावडर आणि काळे मीठ घालून चांगले मिसळा आणि नंतर त्यात पाणी टाकून हे मिश्रण चांगले मिसळा. यानंतर, बरणीला कॉटनच्या किंवा मलमलच्या कापडाने झाकून 2 ते 3 दिवस उन्हात ठेवा. ते दररोज एकदा उघडा आणि सर्वकाही पुन्हा मिक्स करा आणि पुन्हा झाकुन ठेवा. जेणेकरून कांजी पेय परिपूर्ण होईल.
भाताची कांजी
भातापासून बनवलेली कांजी रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा आणि पचनासाठी फायदेशीर आहे. हे करण्यासाठी, शिजवलेला भात घ्या आणि ते एका भांड्यामध्ये रात्रभर सुमारे 8 ते 10 तास भिजत ठेवा. यानंतर सकाळी या पाण्यात मीठ, चिरलेला कांदा, मिरची आणि दही घालून चांगले मिक्स करा. आता यावर तडका देण्यासाठी गॅसवर एक लहान पॅन ठेवा आणि त्यात मोहरीचे तेल गरम होऊ द्या. त्या नंतर त्यात मोहरीचे दाणे, कढीपत्ता, चिमूटभर जिरे घ्या तडका तयार करा आणि भाताच्या कांजीमध्ये तडका द्या. अशा पद्धतीने भाताची कांजी तयार आहे.
बीटरूट कांजी
बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतोच शिवाय पचन सुधारण्यासाठी, शरीराला ऊर्जा देण्यासाठी फायदेशीर आहे आणि त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. अशावेळेस तुम्ही या उन्हाळ्यात बीटरूट कांजी देखील बनवून सेवन करा. हे करण्यासाठी, प्रथम बीट धुवून सोलून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा. यानंतर, एका पॅनमध्ये पाणी गरम करा. आता या गरम पाण्यात बीट टाका. यानंतर 2 ते 3 मिनिटे बीट उकळवा आणि थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर, काळे किंवा साधे मीठ, बारीक केलेली मोहरी, हिंग आणि तिखट असे मसाले चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण एका काचेच्या भांड्यात झाकून ठेवा आणि उबदार ठिकाणी किंवा उन्हात 2 ते 3 दिवस ठेवा. हे मिश्रण दररोज उघडत राहा आणि मिक्स करत राहा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List