‘मनसे भाजपची बी टीम त्यांची….’; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत त्यांनी मनसेवर देखील निशाणा साधला, ते कांदिवलीमध्ये आयोजित मराठीची पाठशाळा या कार्यक्रमात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात राधे राधे, हर हर महादेव, जय श्री राम या घोषणेनं केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, जेव्हा कोरोना होता तेव्हा सगळे घाबरले होते. सर्वांना गावी जाण्याची चिंता होती. मग ना केंद्र सरकारने, ना उत्तर प्रदेश सरकारने ना बिहार सरकारने त्यांचा आवाज ऐकला. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो आवाज ऐकला होता. आणि ते असेही म्हणाले होते, तुम्ही घाबरून जाऊ नका हे पण तुमचंच गाव आहे. त्यावेळी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी कोणालाही आत येऊ देऊ नका असे आदेश दिले होते.
बरेच लोक मुंबईला त्यांच्या कामाचे ठिकाण आणि मराठीला त्यांची मातृभाषा मानतात. पण प्रत्येकाला त्यांची मातृभाषा माहीत असली पाहिजे. तुम्ही ज्या राज्यात जाल त्या राज्यातील लोकांचा आदर केला पाहिजे, आणि तुम्हाला तिथली भाषा अवगत असली पाहिजे, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी मनसे आणि भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे ही भाजपची बी टीम आहे, भाजप आणि मनसेची सेटिंग आहे. सेटिंग करणारे आहेत, त्यांना मी उत्तर देत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठीची पाठशाळा हा एक चांगला कार्यक्रम आहे. तो केवळ कांदिवलीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईत सुरू झाला आहे. मराठीचा अपमान करणाऱ्यांना त्यांची प्रतिक्रिया मिळते. पण ज्यांना मराठी शिकायचे आहे, त्यांच्यासाठी मी एक शाळा घेतली आहे आणि या उपक्रमात मी त्यांचे मनापासून स्वागत करतो असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List