IMD Weather Forecast : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट, उरले फक्त काही तास, आयएमडीचा हायअलर्ट
मोठी बातमी समोर आली आहे, हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. एकीकडे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे, तापमानात मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे आयएमडीचा इशारा?
बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान या काळात राज्यात कमाल तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत, त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे विदर्भात उन्हाचा तडाखा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशावर पोहोचला. विदर्भातील ब्रह्मपुरी व अकोल्यामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर गोंदिया, वाशिम, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ या शहरांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
नागपूर वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजनुसार विदर्भात पुढील दोन दिवस तापमान कायम राहणार असून, त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटसह वादळ वारा आणि पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी झाल्यास नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पावसामुळे हवेत गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List