मध्य रेल्वेवर येणार एक नवीन स्थानक, बदलापूरहून अवघ्या 30 मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार
मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान लवकरच ‘पुढील स्टेशन – कासगाव’ अशी घोषणा ऐकू येणार आहे. बदलापूरकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे बदलापूर आणि नवी मुंबईमधील अंतर केवळ 30 मिनिटांवर येणार आहे. यामुळे नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचणं शक्य होणार आहे.
सध्या बदलापूर शहरातून तसेच मध्य रेल्वेवरुन दररोज हजारो नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईला प्रवास करतात. जर त्यांना रेल्वेने प्रवास करायचा असल्यास त्यांना ठाण्यावरून लोकल बदलावी लागते. तसेच रस्तेमार्गाने नवी मुंबई गाठण्यासाठी एनएमएमटीच्या बस उपलब्ध आहेत. मात्र शिळफाटा आणि तळोजा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाला दीड तासांपर्यंतचा वेळ लागतो. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत पोहोचणे शक्य
या समस्येवर मात करण्यासाठी कासगाव-मोरबे-मानसरोवर या नवीन रेल्वेमार्गाची योजना आखण्यात आली आहे. हा मार्ग सुरु झाल्यास बदलापूरमधील प्रवाशांना नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी याबाबत पत्रव्यवहारही केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. रेल्वेने या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
बदलापूरच्या विकासाला चालना
आता लवकरच बदलापूरच्या प्रवाशांना लोकलमध्ये ‘पुढील स्टेशन – कासगाव’ ही घोषणा ऐकायला मिळणार आहे. ज्यामुळे त्यांचा नवी मुंबईचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे. या नवीन रेल्वेमार्गामुळे बदलापूरच्या विकासालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List