थंडा थंडा कुल कुल होताय, आरोग्य सांभाळा; बर्फ, शीतपेय, दूध दह्याचा दर्जा न ठेवणाऱ्यांवर होणार कारवाई
सूर्य आग ओकू लागल्याने उकाड्याने अक्षरशः नकोसे करून सोडले आहे. असह्य उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिकांनी थंडा थंडा कुल कुल होण्यासाठी शीतपेय, आईस्क्रिम, बर्फाचा गोळा, लस्सीकडे आपला मोर्चा वळवला आहे. पण हीच संधी साधून काही विक्रेते स्वस्तात मस्त म्हणत शरीराला हानीकारक ठरतील असे शीतपेय, बर्फ आदी विकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अन्न व औषध (एफडीए) प्रशासन विभागाने याची दखल घेत अशा विव्रेत्यांना आपल्या रडारवर आणण्यास सुरुवात केली आहे. विशेष मोहीम सुरू करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना दणका देण्याच्या तयारीत पथक आहे.
दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. घामटा आणि अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिकांची पावले आईस्क्रिम पार्लर, लस्सी, ताकाचे दुकान, शीतपेय, बर्फाचा गोळा विव्रेते यांच्याकडे वळू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून अशा पदार्थ व पेयांना मागणी वाढू लागल्याने काही बेजबाबदार विव्रेते आपला खिसा भरण्यासाठी हिच संधी साधण्याच्या तयारीत आहेत. लस्सी, ताक, आईस्क्रिमसाठी लागणारे दूध मिलावटी नसावे, बर्फाचा गोळा बनविण्यासाठी खायच्या बर्फाचाच वापर व्हावा, भेसळ केलेले शीतपेय बाजारात येऊ नये यासाठी एफडीएकडून सावध भूमिका घेतली जाणार आहे. मिलावटी शीतपेय अथवा पदार्थ खाऊन नागरिकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
…तर कारवाई अटळ
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रयत्न करताना कोणी सापडला आणि त्याचे 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर अशा विव्रेत्याला त्यानुसार दंडात्मक कारवाई होईल आणि 12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱया विव्रेत्यांवर मोठी दंडात्मक कारवाई होईल. शिवाय कमी दर्जाचा बर्फ, खाद्यपदार्थ वापरणाऱ्यांविरोधात न्याय निर्णय खटला दाखल केला जाईल. आणि खाद्यपदार्थ असुरक्षित असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्यास संबंधिताविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असे एफडीएच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List