मुंबईवर पाणीसंकट, टँकरची मागणी तिपटीने वाढली, अनेक भागांमध्ये कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे मार्चमध्येच भीषण टंचाई

मुंबईवर पाणीसंकट, टँकरची मागणी तिपटीने वाढली, अनेक भागांमध्ये कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे मार्चमध्येच भीषण टंचाई

>> दीपक पवार

उन्हाळ्याचे आणखी तीन महिने शिल्लक असताना मुंबईवर मार्चमध्येच पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा घटत चालला आहे. त्यामुळे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून मुंबईकरांच्या घशाला अक्षरशः कोरड पडली आहे. परिणामी, जिथे 800 ते 1000 टँकर्सची गरज असते तिथे पिण्याच्या पाण्याचे रोज तब्बल तीन हजार टँकर विविध ठिकाणी पाणीपुरवठा करत आहेत.

मुंबईत गेल्या पाच वर्षांत 40 ते 50 मजल्यांचे टॉवर्स विविध ठिकाणी उभे राहिले आहेत. मोठमोठे प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे उन्हाळा आला की, या टॉवर्सला पाणीपुरवठा करताना मुंबई महानगरपालिकेच्या नाकीनऊ येते. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. डोंगराळ भागात तर उन्हाळ्यात पाण्याला प्रेशरच नसल्याने पाणी वर चढत नाही. तिथेही पाण्याचे टँकर मागवण्यात येत आहेत. एकटय़ा घाटकोपरमध्ये रोज दीडशेहून अधिक टँकर मागवण्यात येत असल्याचे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबीर सिंग वीरा यांनी सांगितले.

बोरवेलमुळे आरोग्य धोक्यात

मुंबईत तीव्र पाणीटंचाई भासत असून अनेक ठिकाणी तर पाणीच नाही. जोगेश्वरीकरांना तर ऑक्टोबरपासूनच रोज पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागत आहे. याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याशी दोनच दिवसांपूर्वी संपर्क साधला, परंतु याबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱयांना सूचना देऊ असे उत्तर त्यांनी दिले, असे शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी सांगितले. अनेक ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बोरवेलचे पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे ते म्हणाले.

पाणी गळतीचा प्रश्न कायम

अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पाणी चोरी आणि पाणी गळती होत आहे. पाईपलाईन्स तुटलेल्या आहेत. पाणीपुरवठा करणारी जी काही यंत्रणा सध्या अस्तित्वात आहे ती अद्ययावत करण्याची गरज आहे, परंतु पालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीसंकट कायम आहे. घाटकोपरमध्ये अनेक ठिकाणी टँकर्स मागवावे लागत आहेत, असे घाटकोपर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांनी सांगितले. दरम्यान, विद्याविहार येथील किरोळ आणि खलई येथे रोज टँकरने पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी अक्षरशः मारामारी होत असल्याचे घाटकोपर पूर्वचे माजी शिवसेना उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोराई गावातील 2 हजार कुटुंबांना मुंबई महापालिका टँकरने पाणीपुरवठा करत आहे. मुंबईत पाईपलाईनच्या दुरुस्तीची कामे सुरू असतात तेव्हा आपण टँकरने पाणीपुरवठा करतो. अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये खासगी टँकर्स मागवण्यात येत असतील. मुंबईला रोज 4 हजार 600 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. – डॉ. भूषण गगराणी (आयुक्त, मुंबई महानगरपालिका)

येथे वॉटर टँकर्सला सर्वाधिक मागणी

कुलाबा, घाटकोपर, मुलुंड, वरळी, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, कुर्ला, विद्याविहार येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वॉटर टँकर्स मागवण्यात येत आहेत.

तलावांची पाणीपातळी वेगाने घटतेय

पाणीपुरवठा करणाऱया सातही धरणांत अर्धाच म्हणजेच केवळ 39 टक्के पाणीसाठा उरला आहे. सध्या धरणांमध्ये 609740 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलैपर्यंत हा पाणीसाठा पुरवावा लागणार असून अनेक ठिकाणी आतापासूनच कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे यंदा पाऊस वेळेवर आला नाही तर पाणीकपातीची वेळ येऊ नये यासाठी राखीव पाणीसाठय़ाच्या वापराची परवानगी द्यावी अशी विनंती पालिकेने सरकारकडे केली आहे.

500 दशलक्ष लिटर कमी पाणीपुरवठा

रोज 4 हजार 500 दशलक्ष लिटर इतके पाणी मुंबईकरांना लागते, परंतु त्यापैकी केवळ 4 हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सध्या होत आहे. म्हणजेच तब्बल 500 दशलक्ष लिटर कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भासत आहे. एकटय़ा जोगेश्वरीत रोज 100 हून अधिक पाण्याचे टँकर येत आहेत. अनेक जण तर आंघोळ न करता कामावर जात आहेत अशी भयंकर स्थिती आहे, असे आमदार बाळा नर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा… इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक पॅरीडी साँग्ज गायल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या खार येथील स्टुडिओ सोमवारी सायंकाळी शिवसैनिकांनी...
IPL 2025 – चौकार अन् षटकारांच्या आतषबाजीत पंजाबचा विजयी धमाका, गुजरात पराभूत
सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल
राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, बी एच पालवे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
विहिरीच्या खोदकामादरम्यान भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
वर्गात बडबड करत होती म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शिक्षिकेवर गुन्हा दाखल
खेड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, कोकण रेल्वे ठप्प; दीड तासांनी वाहतूक सुरळीत