सीएनजी बाटला टेस्टिंगच्या लुटमारीने वाहनचालक गॅसवर, पुण्यात 700 रुपये तर नवी मुंबईत 3 हजार
पेट्रोलचे दर गगनाला भिडल्यानंतर मोठ्या संख्येने वाहनांमध्ये सीएनजी किट बसवले जाऊ लागले आहे. मात्र या सीएनजी बाटला टेस्टिंग एजन्सींकडून प्रचंड प्रमाणात लुटालूट सुरू असल्याने वाहनचालक गॅसवर आले आहेत. सीएनजी बाटला टेस्टिंगचे दर शासनाकडून निश्चित करण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत. पुणे शहरात सीएनजी बाटला 700 ते हजार रुपयांत टेस्टिंग करून दिला जात आहे. मात्र हाच बाटला नवी मुंबईत टेस्टिंग करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. परिवहन विभाग आणि संयुक्त विस्फोटक नियंत्रकांनी बाटला टेस्टिंगच्या दराबाबत हात वर केले आहेत.
सीएनजी गाड्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना सीएनजी किट बसवण्यासाठी काही एजन्सींना परवाना देण्यात आला. अनेक वाहनांना कंपनीमध्ये सीएनजी किट फिट केले जात आहे. सीएनजीवर चालणाऱ्या या वाहनांना तीन वर्षांनी सीएनजी बाटल्याची टेस्टिंग करून घ्यावी लागते. ही टेस्टिंग करण्याचा परवाना शासनाने काही एजन्सींना दिला आहे. मात्र टेस्टिंगचे दर निश्चित करण्यात आले नाहीत, त्यामुळे नवी मुंबईतील बाटला टेस्टिंग करणाऱ्या एजन्सींकडून मनमानी पद्धतीने वाहनचालकांकडून पैसे उकळले जात आहेत. तीन ते साडेतीन हजार रुपये सीएनजी बाटला टेस्टिंगसाठी घेतले जात आहेत.
दराबाबत टोलवाटोलवी
सीएनजी बाटला टेस्टिंगच्या दर निश्चितीबाबत नवी मुंबई रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी यांनी परिवहन कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी दराचा चेंडू थेट केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेच्या कोर्टात टोलवला. या संस्थेनेही सीएनजी बाटला टेस्टिंगसाठी आवश्यक असलेले शुल्क निश्चित करण्याचे आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट करून हात वर केले.
टेस्टिंगचे बिल देण्यात यावे
बाटला टेस्टिंगचे बिल देण्यात यावे. रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. हे संकट ओढावलेले असतानाच सरकारने बाईक, टॅक्सीला परवानगी दिली आहे. ही परवानगी मागे घेण्यात यावी आदी नवी मुंबईतील रिक्षाचालकांनी केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List