‘तारक मेहता..’मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड? दिली प्रतिक्रिया
छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 17-18 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशीच एक भूमिका म्हणजे दयाबेन. अभिनेत्री दिशा वकानीने ही भूमिका साकारली होती. परंतु 2017 मध्ये बाळंतपणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा ‘तारक मेहता..’मध्ये परतलीच नाही. तेव्हापासून चाहत्यांकडून निर्मात्यांना एकच प्रश्न विचारला जातोय की, मालिकेत दयाबेन परत कधी येणार? काही दिवसांपूर्वीच याबद्दलची मोठी अपडेट समोर आली होती. दयाबेनच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी एका अभिनेत्रीची निवड केली असून तिच्यासोबत मॉक शूटिंग सुरू केल्याची ही चर्चा होती. एका मराठी अभिनेत्रीची निवड दयाबेनच्या भूमिकेसाठी झाल्याचं समजलं होतं. त्यावर आता त्या अभिनेत्रीनेच मौन सोडलं आहे.
दयाबेनच्या भूमिकेसाठी अभिनेत्री काजल पिसाळच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. काजलने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती आणि तिची निवडसुद्धा झाल्याचं म्हटलं गेलं होतं. दयाबेनच्या लूकमधील काजलचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना काजल म्हणाली, “मला अनेक लोकांचे कॉल्स आणि मेसेज येत आहेत. परंतु मी हे सांगू इच्छिते की दयाबेनच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली नाही. मी 2022 मध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं आणि तेव्हाचेच फोटो आता व्हायरल होत आहेत. परंतु आता माझी मालिकेसाठी निवड झाल्याच्या चर्चा खोट्या आहेत. ऑडिशन दिल्यानंतर मला निर्मात्यांकडून कोणताच फोन आला नाही.”
काजल सध्या झनक या मालिकेत काम करतेय. तिने 2022 मध्ये दयाबेनच्या भूमिकेसाठी लूक टेस्ट दिली होती. त्यानंतर निर्मात्यांकडून तिला कोणतंच उत्तर मिळालं नाही. दुसरीकडे दिशा वकानीनेही मालिकेत परत येण्यास नकार दिल्याचं कळतंय. दिशा सध्या तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यात व्यस्त आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर तिने पुन्हा अभिनयक्षेत्रात काम करणं सोडून दिलं आहे. नवरात्रीदरम्यान काही कार्यक्रमांमध्ये तिला तिच्या पती आणि मुलांसोबत पाहिलं गेलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List