चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात विविध विषयांवर हात घातला. छावा चित्रपटानंतर निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भूमिका मांडली. यावेळी परिस्थितीनुसार कशा पद्धतीने निर्णय घेतले जातात, त्याची दाखले राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे म्हणाले, हिंद प्रांतात एक अत्यंत कडवट आणि प्रभावी स्वप्न एका व्यक्तीला पडले त्या म्हणजे जिजाऊ साहेब. जिजाबाई त्यांचे स्वप्न, त्यांचे वडील असल्यापासून पाहत होत्या. त्यांना समजत नव्हते हे काय चालले आहे. आमची लोक या लोकांकडे चाकरी का करत आहेत.
इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते…
छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावरुन राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. राज ठाकरे म्हणाले, चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरातून उतरला की हे सर्व उतरले. छत्रपती संभाजी महाराजाचे बलिदान तुम्हाला आता कळले का? विकी कौशलमुळे संभाजी महाराज समजले का? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते.
इतिहासाच्या पानात खोलवर गेला तर…
हल्ली कोणीही इतिहासावर बोलतात, असा टोला मारत राज ठाकरे म्हणाले, विधानसभेतही इतिहासावर बोलतात. औरंगजेबावर बोलतात. माहीत आहे का औरंगजेब काय प्रकरण होते. औरंगजेबाचा जन्म गुजरातचा. दाहोद या गावात झाला होता. इतिहासातून जातीपातीत भिडवणे सोपे आहे. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्यांना संभाजी राजांशी काहीच कर्तव्य नाही आणि औरंगजेबाशी काही कर्तव्य नाही. तुमची माथी फक्त भडकवायची आहे. कसला इतिहास बोलतात. आपण इतिहासाच्या पानात खोलवर गेला तर अपेक्षा आणि भावनांची भांडी फोडतील, असे राज ठाकरे यांनी सुनावले.
छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय अवस्था होती. सर्व जातीचे लोक कुणा ना कुणाकडे कामाला होते. शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीतच होते. त्यानंतर ते निजामशाहीत गेले. तो काळ वेगळा होता. परिस्थिती वेगळी होती, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List