कुणाल कामराविरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग; एकनाथ शिंदेंवरील गाणं भोवलं
उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधातील तीन गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत. याप्रकरणी खास पोलीस ठाण्यात यापूर्वीच एक गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार मुरजी पटेल तक्रारदार आहेत.
मनमाड इथले शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याशिवाय जळगावचे शिवसेना शहरप्रमुख संजय भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरणही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. नाशिक नांदगाव इथले सुनील जाधव यांच्या तक्रारीप्रकरणा दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आता एकत्रित करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदेंवरील कुणालच्या विडंबनात्मक गीतामुळे राज्यात नवा वाद उद्भवला होता. या गीतेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली होती. मात्र त्याबद्दल माफी मागणार नसल्याचं म्हणत कुणाल सोशल मीडियावर दररोज एक व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे. मंगळवारी त्याने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर कुणालने सीतारमण यांच्याबद्दलचाही व्हिडीओ पोस्ट केला होता.
दरम्यान कुणालने घडलेल्या प्रकरणाबद्दल माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच माझ्या विनोदासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणाला जबाबदार धरणं योग्य नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर देत त्याने पोलीस आणि न्यायप्रणालीला सहकार्य करण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदे यांच्याबद्दल अशाच प्रकारच्या टिप्पण्या केल्या होत्या, असंही त्याने नमूद केलं. कामराने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘जे लोक माझा नंबर लीक करण्यात किंवा मला सतत कॉल करण्यात व्यस्त आहेत, त्यांना आता तरी समजलं असेल की माझ्याकडे येणारे सर्व अनोळखी कॉल्स थेट व्हॉइल मेलवर जातात, जिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल, जे तुम्हाला आवडत नाही.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List