मिंधेंच्या दबावतंत्राला ‘दे धक्का’! कामराला जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ, कायदेशीर लढय़ासाठी दोन दिवसांत जमले तब्बल 4 कोटी रुपये
मिंधे गटाच्या गद्दारीची पोलखोल करणारे ‘गद्दार’ गीत गाणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला देशविदेशातून वाढता पाठिंबा मिळत आहे. एकीकडे मिंधे गटाकडून कुणालवर नवनव्या कारवाईतून दबाव टाकला जात आहे. याचवेळी कुणालच्या कायदेशीर लढय़ासाठी जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू राहिला असून दोन दिवसांत त्याच्या खात्यात तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
कुणालने महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर योग्यच भाष्य केले, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्र-हिंदुस्थानसह इतर देशांतील चाहतेही व्यक्त करीत आहेत. प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे. असे असतानाही कुणालला कायदेशीर कारवाईचे भय दाखवले जात आहे. याचवेळी कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून आर्थिक मदतीचा तुफान ओघ सुरू राहिला आहे. या मदतीच्या रूपात दोन दिवसांत कुणालच्या खात्यात तब्बल 4 कोटी 7 लाख 80 हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. देशविदेशातून कुणालला मिळणारा हा पाठिंबा मिंधे गटाच्या दबावतंत्राला मोठा धक्का मानला जात आहे.
कामरा, अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंगाची सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचे सांगत दोघांविरोधात भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत आज हक्कभंगाची सूचना मांडली. विधानसभेतही सुषमा अंधारे यांच्याविरोधात रमेश बोरनारे यांनी हक्कभंग दाखल केला.
पोलिसांनी पाठवले दुसऱ्यांदा समन्स
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला आज रात्री उशिरा खार पोलिसांनी चौकशीसाठी राहण्यासाठी समन्स पाठवले. कुणालच्या वकिलांनी मुदतवाढीसाठी विनंती केली होती, मात्र ती विनंती पोलिसांनी फेटाळून लावली. खार पोलिसांनी नुकताच कुणालला समन्स पाठवून हजर राहण्यास सांगितले होते. कुणाल हा मुंबईत नसल्याने चौकशीसाठी हजर राहणे शक्य नसल्याने मुदत वाढवून मिळावी यासाठी त्याच्या वकिलांनी पोलिसांना विनंती केली होती. व्हायरल झालेला तो व्हिडीओ जुना असल्याचे कामराच्या वतीने त्याच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List