उद्धव ठाकरे यांना आरोपी करा, सतीश सालियान यांच्या वकिलांच्या आरोपांच्या धडाधड फैरी, काय केली मागणी
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. तिचे वडील सतीश सालियान यांच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणाटी आरोप केला आहे. अॅड. निलेश ओझा यांनी केलेल्या या नवीन आरोपांमुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी एकामागून एक धडाधडा आरोपांच्या फैरी झाडल्या. या प्रकरणामुळे इतर सर्वच मुद्दे बाजूला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिशा सालियनचे वडील सतीश सालियान हे अॅड. निलेश ओझा यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला पोहचले. त्यांनी आज हायकोर्टाने सुधीर व्होरा प्रकरणात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूची तक्रार दिली. गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्याकडे ही तक्रार देण्यात आली. याप्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरया, सुरज पांचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंग, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती या सर्वांना आरोपी करण्याची विनंती करण्यात आली. अॅड. निलेश ओझा यांच्या मते ही तक्रारच एफआयआर आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर सर्वात मोठा आरोप
पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी याप्रकरणात आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप अॅड. निलेश ओझा यांनी केला. त्यांनी याप्रकरणात पहिली पत्र परिषद घेत, सदर फ्लॅटवर कोणताही राजकीय नेता हजर नसल्याचा दावा केला होता. त्यांचा या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न होता, असे अॅड. ओझा म्हणाले.
दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत सर्वात मोठा आरोप केला. आदित्य ठाकरे हे ड्रग्स व्यवसायात सहभागी असल्याचा गंभीर आरोप अॅड. ओझा यांनी लावला. याविषयीची सविस्तर माहिती दिल्याचे वकील ओझा म्हणाले. डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यातील संभाषणाचा आधार त्यासाठी त्यांनी घेतला. समीर खान हे ड्रग्स सिंडिकेटमधील मोठे नाव असून वरील सर्वांचे त्याच्याशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्टिव्ह पिन्टो कुठं गायब झाला?
दिशा सालियान हिचा एक मित्र होता, स्टिव्ह पिन्टो, त्याने त्याच्या ट्विटर, आताचे एक्स खात्यावर काही पोस्ट लिहिल्या होत्या. त्यात ७ जून २०२० रोजी एकता कपूर हिच्या घरी पार्टी झाली. त्यात कोण कोण होतं, दिशाच्या हत्येमागे कुणाचा हात होता, याविषयी त्याने काही हिंट दिल्या होत्या. पण त्यादिवसापासून पिन्टो गायब आहे. आमच्याकडेही अनेक प्रत्यक्षदर्शी असल्याचा खळबळजनक दावा वकिलांनी केला. त्यांनी पिन्टोचा जबाब नोंदवण्याची मागणी केली. १० प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा वकील ओझा यांनी केला. तर त्याचसोबतच आमची तक्रार खोटी निघाली तर तक्रारकर्त्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे ही नमूद केल्याचे ओझा म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांच्यावर या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले. याप्रकरणातील दुसरे दोषारोपपत्र का दाबण्यात आले. ते कुणाच्या विरोधात होते, असा सवाल वकील ओझा यांनी केला. दिशा सालियान यांच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी जे काही गुन्हे केले, त्यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा पूर्ण गैरवापर केला. परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे त्यांच्या सांगण्यावरून काम करत होते असा आरोप वकील ओझा यांनी लावला. उद्धव ठाकरे यांना आरोपी करण्याची मागणी वकील निलेश ओझा यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List