लेख – नॅशनल लायब्ररीः अमृताचे देणे

लेख – नॅशनल लायब्ररीः अमृताचे देणे

>> प्रमोद केशव महाडिक

 ‘ हि ज्ञानेन सदृर्श पवित्रमिह विद्यतेअर्थात, ज्ञानाहून पवित्र असे काही या जगात नाही. आजच्या काळातले ज्ञानदानाचे, ज्ञानसंवर्धनाचे आणि ज्ञानप्रसाराचे पवित्र कार्य करणारे स्थान म्हणजे ग्रंथालय. आपली शतकोत्तर परंपरा आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपत मुंबईतील वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी संस्थेने नव्या युगाच्या काळात वाचन संस्कृतीशी विश्वासाचे आपुलकीचे नाते जपले आहे. या ग्रंथालयाच्या वास्तूला आज (26 मार्च) 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त इमारतीच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणारा लेख.

मुंबईतील वासुदेव गंगाधर ऊर्फ नाना ठाकूर, दत्तात्रय श्रीधर तेंडुलकर, शंकर धनाजी चिरमुले आणि विष्णू धनाजी चिरमुले या चार साहित्यप्रेमींनी 1917 मध्ये एका पडक्या खोलीत ग्रंथालय सुरू केले. आज 108 वर्षांनंतर ‘नॅशनल लायब्ररी’ या नावाने हे तीन मजली अत्याधुनिक सुखसोयींनी आणि सुविधांनी युक्त असे ग्रंथालय ग्रंथ व वाचन चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आजवर दि. वि. वाघ, द. न. वांद्रेकर, स. सी. नाईक, स. भा. कुडाळकर, म. ल. डहाणूकर, ना. द. सामंत, पु. ग. खेर, प्रभाकर वैद्य, जगन्नाथ महाजन, रामदास नायक, मधुसूदन मोरे, अतुल मोहिले यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

तब्बल 1 लाख 57 हजार पुस्तकांचा समृद्ध ठेवा असणारी ही लायब्ररी म्हणजे मुंबईच्या साहित्य, कला व सांस्कृतिक प्रगतीचा साक्षीदार आहे. नॅशनल लायब्ररीची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांत कार्यकारिणी आली, नवे पदाधिकारी आले. हळूहळू ग्रंथसंपदा वाढली, वाचक वाढले. सभासद आणि पुस्तकांची संख्या चांगलीच वाढली. साहजिकच संस्थेला जागेची कमतरता भासू लागली. संस्थेच्या तत्कालीन पदाधिकाऱयांनी प्रयत्न करून नगर पालिकेकडून भरणी घातलेल्या तलावाच्या जमिनीच्या कडेची 850 चौरस वारांची जागा मिळवली. हा भूखंड ताब्यात आला तोवर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. 2 नोव्हेंबर 1948 रोजी तेव्हाच्या मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते इमारतीची पायाभरणी करण्यात आली. 26 मार्च 1950 रोजी मुंबई इलाख्याचे त्या वेळचे राज्यपाल राज महाराज सिंग यांच्या हस्ते लायब्ररीच्या इमारतीचे उद्घाटन झाले. स्वतःची आणि सुसज्ज अशी वास्तू मिळाल्याने ग्रंथालयाला नवी झळाळी मिळाली. कालांतराने या इमारतीच्या बाजूने भोईवाडय़ातून म्हणजे आताच्या नंदी गल्लीपासून-वांद्रे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला ‘नॅशनल लायब्ररी रोड’ असे नाव दिले.

1949 मध्ये सरकारने या लायब्ररीला ‘तालुका ग्रंथालयाचा’ दर्जा दिला. हळूहळू या वास्तूत संस्थेचा कारभार बहरला. भरभराट होत गेली. उत्तरोत्तर पुस्तकांची संख्या वाढत होतीच. नवनवीन उपक्रम राबविण्यात आले आणि ते यशस्वीरीत्या पारही पडले. उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी मोफत पुस्तक वाचन सुरू झाले. वनिता समाजाचे कार्यक्रम होऊ लागले. मोफत वृत्तपत्र वाचन सुरू करण्यात आले. सातत्याने सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. ती आतापर्यंत कायम आहे. काळानुसार संस्थेचा व्याप वाढत गेला तसे इमारतीचे दोन मजले कमी पडू लागले. त्या वेळी पुलोद सरकारमधील शिक्षणमंत्री आणि संस्थेचे हितचिंतक तसेच वांद्रे येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रा. सदानंद वर्दे यांच्या पुढाकाराने व तेव्हाचे नगरविकास मंत्री हशु अडवाणी यांच्या प्रयत्नांनी लायब्ररीच्या इमारतीचा विस्तार तिसऱ्या मजल्यापर्यंत गेला. ही घटना 1981 सालची. नंतर संस्थेचा सुवर्ण महोत्सव 1992 मध्ये साजरा करण्यात आला. त्या वर्षात राज्य सरकारचा उत्कृष्ट ग्रंथालयासाठीचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ नॅशनल लायब्ररीस प्राप्त झाला. लगेच संस्थेला  ‘मुंबई उपनगर जिल्हा अ ग्रंथालय’ म्हणून मान्यताही मिळाली. कालांतराने संस्थेने आपल्या वास्तू निर्मितीचा सुवर्णमहोत्सवही साजरा केला. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर आवर्जून उपस्थित होते.

काळानुसार संस्थेने अंतर्गत रचनेतही बदल केले. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पुस्तके ठेवण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या फोल्डिंग रॅक्स कॉम्पॅक्टर्स म्हणजे सरकत्या घडवंच्या घेतल्या गेल्या. त्यामुळे मोकळी जागा मिळाली आणि दुसऱ्या मजल्यावर आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे सभागृहही तयार झाले.

संस्थेने 2016-17 या वर्षात शतकोत्सवानिमित्त आपल्याकडील शेकडो दुर्मिळ आणि इतर ग्रंथसंपदा यांचे डिजिटायझेशन केले.  आजवर 6200 पुस्तकांच्या सुमारे 15 लाख 50 हजार पानांचे ‘की-वर्डस्’ या संज्ञेच्या माध्यमातून अंकीकरण झाले आहे. त्याद्वारे वाचकांना हवे असलेले पुस्तक हवे तेव्हा सहज वाचता येऊ शकते.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये कोरोना महामारीने अवध विश्व संकटात टाकले. पण ही आपत्ती न समजता संधी समजून संस्थेने त्या काळात फॉक्सप्रोमधील डेटा पूर्णपणे क्लाऊड बेसवर हस्तांतरित केला. परिणामी या प्रणालीद्वारे संस्थेच्या सेवकांनी घरी बसून पुस्तक नोंदणी व जमाखर्चाचे काम संगणकावर अपलोड केले. संस्थेचा संदर्भ विभाग उल्लेखनीय आहे. तिथली 5 हजारांहून अधिक पुस्तके इतर पुस्तकांप्रमाणेच वाचक सभासदांना घरी वाचायला दिली जातात. सुमारे 3 हजाराहून अधिक पुस्तके, जुने ग्रंथ गेल्या शतक-दीड शतकातील विविध कोश अभ्यासकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. त्यात महाराष्ट्र ज्ञानकोश’ (1926), महात्मा गांधी वाड्मयाचे 23 खड’, ’समग्र केळकर वाङ्मयाचे खंड’, ’भारतीय संस्कृती कोश (1889) द.मा. मराठे यांचे ’जगाचा इतिहास’ (1956), ’मराठी व्युत्पुती कोश (1946), सिध्देश्वर शास्त्री चित्राव याचा भारतवर्षीय प्राचीन कोश’ (1932), रा. गो. कानडे याचा मराठी नियकालिकांचा इतिहास (1832ते 1937), ग.रा. भिडे यांचा ’व्यावहारिक जानकोश’ भाग 2 व 3 (1938), गणेश गर्दै यांचे सार्थक वाङ्मय’ (1878), श्रीधर केतकर यांची महाराष्ट्र वाङ्मय सूची (1919), विष्णू जोग महाराज यांची ’सार्थ श्री तुकारामाची गाथा’ (1931) आदी वैविध्यपूर्णसाहित्य या ग्रंथालयात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) माहिती तंत्रज्ञानात वाढता वापर आणि गरज पाहून संस्थेने अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी ‘बाबाजी धोंडू शेलार माहिती केंद्र’ सुरू केले. त्याद्वारे सराव परीक्षा, व्हिडीओज, शोध मासिके, बालभारती पुस्तके, अतिरिक्त संसाधने यांचा यथायोग्य ताभ विद्यार्थ्यांना दिला गेला.

गेल्या 75 वर्षांत संस्थेच्या या वास्तूत हजारो वाचक घडले, हजारो विद्यार्थी घडले, हजारो साहित्यिक घडले. एका अर्थाने अनेक पिढ्या इथे घडल्या असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अर्थात, अमृत महोत्सवी वर्षात या वास्तूने अनेकांचे कष्ट पाहिले आहेत. आज त्या कष्टाचे सार्थक झालेले दिसत असताना त्यांच्या कष्टाचे ऋण कधीही न फिटणारे आहे. या वास्तूच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्ञानार्जनाचा ग्रंथोत्सव चिरस्मरणीय ठरावा, हीच शुभकामना!

(लेखक नॅशनल लायब्ररी, वांद्रेचे प्रमुख कार्यवाह आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. तर दहशतवाद्याचा खात्मा...
IPL 2025 – मिचेल मार्श आणि निकोलस पुरनचा वादळी धमाका, लखनऊचा हैदराबादवर 5 विकेटने विजय
मंत्रालयात प्रवेशासाठी अत्याधुनिक प्रणाली, आता मंत्रालयात जाताना अवलंबन करावी लागणार ही पद्धत
‘…तर आदित्य ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट करायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणात कदमांची मोठी मागणी
India Tour Of England- इंग्लंड दौऱ्यातून रोहित शर्मा आऊट? विराट कोहलीही मुकण्याची शक्यता
श्रीलंकेच्या नौदलाने 11 हिंदुस्थानी मच्छिमारांना केली अटक, बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोप
Nanded News – गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, काय आहे प्रकरण?