शाळकरी मुलांकडून ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेवर प्रेमाचा वर्षाव; पहा खास व्हिडीओ
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट आणि वल्लरी विराज हे एजे आणि लीलाची मुख्य भूमिका साकारत आहेत. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. ऑफस्क्रीनसुद्धा या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच राकेशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या सेटवर नुकतीच एका शाळेतील विद्यार्थी पोहोचले होते. यावेळी सर्वांनी त्यांच्या लाडक्या राकेशला घेरलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या सेटवर शाळकरी मुलांनी गर्दी केली. अभिराम जहागीरदार ऊर्फ एजेला पाहताच त्यांनी त्याच्याभोवती घोळका घातला. राकेशने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘ऑल हार्ट्स.. नवरी मिळे हिटलरला’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कोणी राकेशचा हात मिळवताना तर कोणी त्याच्यासोबत फोटो काढताना दिसत आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून मिळणारं इतकं प्रेम पाहून राकेशसुद्धा भारावला. राकेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘प्रेक्षकांच्या या प्रेमावर तुझा अधिकार आहे’, असं एकाने लिहिलं. ‘मी या चाहत्यांमध्ये असते तर तुम्हाला भेटता आलं असतं, प्रत्यक्षात पाहता आलं असतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
सध्या मालिकेत लीला आणि एजे यांच्यातील प्रेम फुलतंय. काही दिवसांपूर्वीच मालिकेतील कलाकार काश्मीरमध्ये रोमँटिक सीनच्या शूटिंगसाठी गेले होते. लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी एजे सगळी तयारी करतो. लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज हवं होतं. एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं ,जिथे छान बर्फ असेल आणि बर्फाच्या मध्ये उभं राहून रोमँटिक डान्स करायचा अशी तिची इच्छा होती. त्यानुसार दोघं काश्मीरमध्ये जातात आणि तिथे मस्त शिकारा राइडही करतात. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List