Kunal Kamra Controversy – वा कुणाल, क्या मारा! ‘गद्दार’ गीताचे महाराष्ट्रात तुफान
मिंधेंच्या गद्दारीची सालटी काढणाऱ्या ‘गद्दार’ गीताने आज संपूर्ण महाराष्ट्रभर तुफान आले. गद्दारी, गुवाहाटीतील लपाछपी, पक्षचोरी, पळवापळवी या मिंधेंच्या ‘अव’गुणांवर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने परफेक्ट बोट ठेवले आणि गाण्यातून जोरदार फटकारे मारले. त्यामुळे ‘वा कुणाल, क्या मारा…!’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. काही ठिकाणी लोक आनंदाने नाचले तर अनेकांनी हे गाणे स्वतःच्या आवाजात गात सोशल मीडियावर पोस्ट केले. हे गाणे ट्रेंडिंगमध्ये आले असून लोकशाही मानणाऱया जनतेने गाणे डोक्यावर घेतले आहे. दरम्यान, कुणालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतरही हे गीत मागे घेणार नाही, असे त्याने ठणकावून सांगितले आहे.
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बनवण्यासाठी मिंधे गटाने शिवसेनेतून गद्दारी केली आणि भाजपशी हात मिळवणी केली. हे करताना गुवाहाटीपर्यंत केलेल्या कारनाम्यांवर परखड भाष्य करणारे गीत कुणाल कामराने रविवारी सायंकाळी सोशल मीडियात पोस्ट केले. पुढच्या काही मिनिटांतच हे गाणे प्रचंड व्हायरल झाल्याने मिंधे गटाची पुरती नाचक्की झाली. नंतर मिंधे गटाच्या गुंडांनी खार येथील स्टुडिओवर तोडफोड केली. कुणालला ’गद्दार’ गीत मागे घेण्यासाठी धमकीही दिली. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जोरावर कुणालने हार मानली नाही.
पालिकेने बुलडोझर चालवला
रात्रभर अस्वस्थ झालेल्या मिंधेंनी सोमवारी सकाळी महापालिकेची यंत्रणा कामाला लावली आणि कुणालच्या खार येथील स्टुडिओवर पाडकामाची कारवाई करण्यास भाग पाडले. ही कारवाई करताना स्टुडिओच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दबाव आणण्यासाठी मिंधे गटाने केलेल्या या कारवाईवर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कुणालच्या समर्थनार्थ आणि मिंधे गटाच्या निषेधार्थ राज्यभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या.
एकनाथ शिंदेंच्या गँगला राग का आला? आदित्य ठाकरे यांचा सवाल
कुणाल कामरा याच्या विडंबन गीतावरून आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता त्यांनी विधिमंडळ परिसरातील मीडिया सेंटरवरून संवाद साधला. ते म्हणाले, कुणाल कामरा याने केलेले विडंबन गीत हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच आहे, हे त्यांना कसे कळले की, ते त्यांच्याबद्दलच आहे. ते स्वतः चोर नाहीत, गद्दार नाहीत तर मग तोडपह्ड का केली? कारण ते गद्दार आणि चोर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गँगला राग आला. त्यांना मिरची लागली. काही जण तर प्रसारमाध्यमांतून उघडपणे तालिबानसारखे धमकी देत आहेत. तोडफोड करणाऱ्या आणि जाहीरपणे धमकी देणाऱयांवर सरकारने काय कारवाई केली आहे, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरांवर अशा प्रकारची कारवाई का केली नाही? शिंदे गटातील एका खासदाराने तर शिंदे यांची तुलना सापाशी केली आहे. ही खूपच वाईट गोष्ट आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
धमकी देणाऱ्या चमच्याची कुणालने घेतली फिरकी,
जगदीश अण्णा- तुने सीएम साहब के बारे में क्या बोला?
कुणाल – वो सीएम नहीं डिप्टी सीएम हैं
जगदीश अण्णा – किधर रहता है तू?
कुणाल – तमिलनाडू
जगदीश अण्णा – किधर आने का?
कुणाल – तमिलनाडू
जगदीश अण्णा – अभी तमिलनाडू कैसे पहुंचेगा भाई?
महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? – हर्षवर्धन सपकाळ
कामराने केलेले काव्यात्मक विडंबन ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे महायुती सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का? सत्ताधारी भाजप युतीला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? अजित पवारही तेच बोलले होते, माफी मागणार नाही!
‘बारक्या पोरालाही कळायला लागलं पन्नास खोके एकदम ओके…वॉय वॉय करत ताफा चालला की लोक म्हणतात तो बघ गद्दार चाललाय, पन्नास खोकेवाला चाललाय’, असे अजित पवार म्हणाले होते. त्याच व्हिडीओचा दाखला देत, मी जे शिंदे यांच्याबद्दल म्हणालो अगदी तेच शब्द शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनीही वापरले होते, असे कुणाल कामराने नमूद केले. मी माफी मागणार नाही, असेही त्याने ठणकावले. हॅबिटेट येथे अनेक प्रकारचे शो होतात. त्यामुळे मी केलेल्या विनोदाचा निषेध म्हणून त्या ठिकाणाचीच तोडफोड करणे हे, निरर्थक आहे, असेही कामराने नमूद केले. एल्फिन्स्टन पूल किंवा तातडीने एखादं पाडकाम करायचं आहे अशा ठिकाणी मी माझा पुढचा शो करेन, असा तीरकस बाणही कामराने आपल्या स्टेटमेंटमधून डागला. दरम्यान, पोलिसांनी बोलावले तर तपासात सहकार्यच करेन. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही कॉमेडियन आहोत, नवीन स्टुडिओ उभारू, मशीन आणि खुर्च्या विकत आणू, असे कुणाल कामराने निक्षून सांगितले.
तोडफोडीमुळे धक्का बसला, काळजी वाटतेय! – स्टुडिओ चालकांनी स्टुडिओ बंद केला!
मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओमध्ये धुडगूस घातल्यानंतर खार येथील ’ हॅबिटॅट’ स्टुडिओच्या व्यवस्थापनाने स्टुडिओ बंद करण्याचा निर्णय घेतला. तोडफोडीमुळे मोठा धक्का बसला आहे, आम्हाला काळजी वाटतेय. आम्ही खचून गेलो आहोत, अशी हताश प्रतिक्रिया स्टुडिओ व्यवस्थापनाने सोशल मीडियात शेअर केली. कलाकार मंडळी जे विचार मांडतात, त्यासाठी ते सर्वस्वी जबाबदार असतात. असे असताना आम्हाला टार्गेट केले गेले, अशी खंत स्टुडिओ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
ईडी व सीबीआयचीही चांगलीच जिरवली!
पूर्वी न्यायाधीश म्हणायचे की ईडी आणि सीबीआय म्हणजे पिंजऱ्यात बंद पोपट आणि मैना. नंतर 2014 मध्ये मोदीजी आले. विराट हिंदू. ते म्हणाले हे काय आहे? ह्यांना बंद का करून ठेवले आहे? त्यांचे हात का बांधले आहे? मोकळे करा ह्यांना… पिंजरा खोलू नका. फक्त हात मोकळे करा बस्स. आधी हे पिंजऱ्यात बंद होते. आता पिंजऱ्यातून कॅबरे करीत आहेत. महाराष्ट्रात ह्यांनी काय केले आहे? ईडीने ते केले आहे, जे मिशनरी करू शकल्या नाहीत. हृदय परिवर्तन. तुम्ही एका गोष्टीचा विचार करीत होता, ईडी घरी आली आणि आता दुसरा विचार करत आहात. बिचारा पोप.. पैसे मोजता मोजता थकला. हिंदुस्थानात पैसा टाकतोय, हॉस्पिटल टाकतोय शाळा उभारल्या, सांताक्लॉज-गिफ्ट दिल्या. बायबल सोडून बाकी सगळे द्या, असे इथले लोक बोलू लागले, असे परखड मत मांडत कुणालने सीबीआय आणि पिढीच्या स्वातंत्र्यावर गाणे सादर केले. ’सीबीआय जो पीछे लग जाये, या ईडी तुझे सताये.. आजा प्यारे पास हमारे… काहे घबराये काहे घबराये….’ असे गाणे गात कुणालने केंद्रीय तपास यंत्रणांचीही चांगलीच जिरवली.
कारवाईचे नाटक 11 हल्लेखोरांना अटक
कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये कार्यक्रम घेतला होता. तिथे जाऊन मिंधेंच्या गुंडांनी धुडगूस घातला. याप्रकरणी कारवाईचे नाटक करत राहुल कनाल, कुणाल सरमळकरसह 11 जणांना अटक करण्यात आली.
खार पोलीस ठाण्यात हल्लेखोरांची बडदास्त
अटकेनंतर खार पोलीस ठाण्याच्या कोठडीत हल्लेखोरांची पोलिसांकडून बददास्त ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या सर्वांसाठी हॉटेलमधून पार्सल मागवण्यात आले. हे पार्सल पोलीस स्टेशनमध्ये नेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
मला बोलण्याचा हक्क संविधानाने दिला आहे
तोडफोडीच्या घटनेनंतर कुणाल कामराने संविधान हातात घेतलेला व्हिडिओ पोस्ट करत आपल्या विडंबन गीतावर ठाम असल्याचे सांगितले आहे. ‘मी जे काही बोललो आहे ते बोलण्याचा हक्क मला या संविधानाने दिला आहे आणि याच संविधानाच्या चौकटीत राहून तुम्ही तुम्हाला जे काही करायचे आहे ते करण्यासाठी स्वतंत्र आहात’, असे कुणालने निक्षून सांगितले.
म्हस्के बघा काय म्हणताहेत, तुम्ही सापाच्या शेपटीवर पाय दिलाय
मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामराला धमकावण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला. मात्र, कुणालला धमकावत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची सापाशी तुलना केली. ‘कुणाल कामरा, सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला ना तर भारी पडेल’, असे म्हस्के म्हणाले. म्हस्के यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ‘म्हस्के शिंदेंना साप म्हणाले. कोणी येतं काहीही बोलून जातं. काही इज्जत हाय का नाय राव’, असा टोला एका नेटकऱयाने हाणला आहे.
गद्दार गीत
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
एक झलक दिखलाये
कभी गुवाहाटी में छुप जाये
मेरी नजर से तुम देखो
तो गद्दार नजर वो आये…
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है…
और कहा क्या जाये?
जिस थाली में खाये
उसमेही छेद कर जाये
मंत्रालय से ज्यादा
फडणवीस के गोदी में मिल जाए
तीर कमान मिला है इसको
बाप मेरा ये चाहे
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List