Kunal Kamra Controversy – व्यंगात्मक नाही हे सत्यात्मक गाणं – उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामरा यांचे समर्थन केले आहे. कुणाल कामरा यांनी व्यंगात्मक गाणे केले असे मला वाटत नाही. त्यांनी सत्यात्मक गाणे केले आहे. त्यांनी जनभावना मांडली आहे आणि सत्य बोलणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगतानाच, शिवसेना कुणाल कामराच्या पाठीशी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जे उघड उघड चोरी करतात ते गद्दार आहेत. कामराच्या स्टुडिओची तोडफोड झाली त्याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ते शिवसैनिक नव्हते, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विधान भवन आवारात उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुणाल कामराप्रकरणी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली. ते म्हणाले की, कुणाल कामरा यांच्या गाण्यावरून गद्दार सेनेच्या गटाच्या तथाकथित नेत्याचा अपमान झाला असे वाटल्याने भेकडांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही, कोश्यारींनी अपमान केला तेव्हा त्यांचा विरोध करण्याचे धाडस यांच्यात नाही. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केले असे माझे मत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांचे उदात्तीकरण करणारा आणि शिवरायांचा अपमान झाला असताना गप्प बसणारा शिवसैनिक कदापि होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
गद्दारांकडून मुख्यमंत्री आणि पोलिसांचा दरारा कमी करण्याचे काम राज्यात चालले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे राज्यात काहीच चालत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो वेळीच चिरडून टाकला पाहिजे.
…मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती?
कुणाल कामराला सुपारी दिली गेली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असल्याचे माध्यमांनी विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाची कबर उखडण्याची सुपारी कोणी दिली होती? नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका, राज्याची वाट लागत चालली आहे. गद्दारांचे उदात्तीकरण फडणवीसांना मान्य असेल तर देवसुद्धा त्यांचे पद वाचवू शकत नाही.’
नागपूर दंगलीसारखी कामरालाही नुकसानभरपाई द्या, भामट्यांकडून दामदुपटीने वसूल करा
न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. नागपूरमधील दंगलीत ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तशीच नुकसानभरपाई कुणाल कामरालाही देण्यात यावी आणि त्याचा स्टुडिओ ज्यांनी तोडला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो, मात्र गद्दारांचा अपमान केलेला चालत नाही त्या भामटय़ांकडून दामदुपटीने भरपाई वसूल करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी कृती कुणीही करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यावर, अजित पवार यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच तसे करत असतील तर त्यांनी आधी त्यांना आवर घातला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवराय, शंभूराजेंचा वारसा चालवायचाय की गद्दार, अनाजीपंतांचा?
एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवताहेत अशा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचे की गद्दारांचा? अनाजीपंतांचा वारसा चालवायचा की छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा घेऊन पुढे जायचे? असा माझा सरकारला प्रश्न आहे. अनाजीपंतांचा वारसा घेऊन पुढे जायचे असेल तर फडणवीसांचे वक्तव्य आपण समजू शकतो,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List