Kunal Kamra Controversy – औरंगजेबानं मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचे मंदिर तोडलं; हिंमत असेल तर मलबार हिलला बुलडोझर फिरवा! – संजय राऊत
मिंधेंच्या गद्दारीची सालटी काढणाऱ्या ‘गद्दार’ गीताने संपूर्ण महाराष्ट्रभर तुफान आले. मात्र या गीतामुळे अस्वस्थ झालेल्या मिंधे गटाने महापालिकेची यंत्रणा कामाला लावली आणि कुणालच्या खार येथील स्टुडिओवर पाडकामाची कारवाई करण्यास भाग पाडले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
‘कुणाल कामरा या क्षेत्रात नवीन आलेला तेव्हा त्याने काँग्रेस पक्षावर, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावरही अशा प्रकारचे शो केले होते. पण काल कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट हॉटेलचा स्टुडिओ, व्यासपीठ अनधिकृत दाखवून तोडण्यात आले. तुमच्यावर टीका केल्यानंतर या वास्तूमध्ये बेकायदेशीर काम केल्याचा साक्षात्कार तुम्हाला झाला का?’, असा सवाल राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, ‘तरुण कलाकारांचे एक व्यासपीठी सरकारने तोडले. कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करू शकत होतात, पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. औरंगजेबाने मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचे मंदिर तोडले. जर तुम्हाला अनधिकृत बांधकामे तोडायची असतील तर मलबार हिलला बुलडोझर फिरवा. सर्व मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये महापालिकेची परवानगी न घेता 100 टक्के बेकायदेशीर कामं झालेली आहेत. महापालिकेने अगदी वर्षा बंगल्यापासून निरीक्षण करावे. सगळे सरकारी अधिकारी, मंत्री असतील त्या प्रत्येकाच्या घरात, मागे-पुढे, आतमध्ये या स्टुडिओपेक्षा मोठी अनधिकृतपणे कामं झालेली आहेत. आम्ही कायद्याचे पालन करणार लोक आहोत म्हणता ना, मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा.’
कुमाल कामरा याने काहीही चुकीचे केलेले नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला, गद्दाराला गद्दार, चोराला चोर आणि लफंग्याला लफंगा म्हणणे हा देशद्रोह असतो का? आपण औरंगजेबाला तेच म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी बेईमानी करणाऱ्यांनाही आपण बेईमानच म्हणतो, असे राऊत म्हणाले. तसेच कुणाल कामरा चुकला असेल, त्याने मांडलेली भूमिका कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करा. तो कायदेशीर लढाई लढेल, पण तुम्ही गुंडगिरी करताय, असा घणाघात राऊत यांनी केला.
बहुमत फार चंचल असते!
नागपूर दंगलीवरही राऊत यांनी यावेळी भाष्य केले. मोठ्या दंगलीचे मास्टरमाइंड हे नेहमी सरकारमध्येच असतात. सरकार कुणाचे आहे? तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरवताय, पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. तुम्ही नि:पक्ष राज्यकर्ते असाल, शिवरायांचे नाव सांगत असाल तर छत्रपती शिवाजी महाजारांनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांनाही सोडले नाही. त्यामुळे उगाच शिवरायांचे नाव घेऊ नका. तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे. नुसते विरोधकांवर चिखल उडवायचा आणि छाछुगिरी करायची त्याला राज्य करणे म्हणत नाही. ठीक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे. पण बहुमत फार चंचल असते, कधी सरकेल इकडे-तिकडे तेव्हा कळेल आपण काय चुका केल्या होत्या, असेही राऊत म्हणाले.
…तर पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर करेन, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List