रस्ते घोटाळ्याच्या बैठकीतून शिंदेंचा काढता पाय, आदित्य ठाकरे यांची एकटक करडी नजर
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणातील घोटाळा, रखडलेली कामे, वाहतूक कोंडी या मुद्द्यांवरून आज शिवसेनेसह भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पडकले. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे एकटक करडी नजर ठेवली होती. त्यामुळे शिंदे अस्वस्थ होते. त्यात भाजपच्या आमदारांनीही घेरल्याने आधीच उशिरा आलेल्या शिंदे यांनी सात मिनिटांत बैठकीतून काढता पाय घेतला. मुंबईतील रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात विधानसभेत झालेल्या चर्चेत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील आमदारांची बैठक बोलावली होती.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे तसेच मुंबईतील सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते.
या बैठकीला सुरुवात झाली, तरीही एकनाथ शिंदे आले नव्हते. भाजपसह मुंबईतल्या सर्व खासदारांनी रस्त्यांच्या कामांना होणारा विलंब, संपूर्ण मुंबईती रस्ते खणून ठेवल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे यावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. आदित्य ठाकरे यांनी तर रस्त्यांच्या कामांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. काही वेळाने एकनाथ शिंदे बैठकीसाठी अध्यक्षांच्या दालनात आले. आदित्य ठाकरे हे एकटक करडय़ा नजरेने एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट बघत होते. पण आदित्य ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत एकनाथ शिंदे यांना होत नव्हती. सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या मुद्द्यावरून सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदे यांना घेरले. त्यामुळे शिंदे आल्यावर पाच ते सात मिनिटांमध्ये बैठक गुंडाळण्यात आली.
बैठकीत काय ठरले
- 31 मे पूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करावीत
- एप्रिलअखेरीस पुन्हा रस्त्यांच्या कामासंदर्भात आढावा बैठक
- पावसाळ्यापूर्वी नव्याने रस्त्यांची कामे सुरू करू नयेत
- प्रत्येक रस्त्याच्या पूर्णत्वाचे वेळापत्रक
- अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महानगर गॅस, बेस्ट व इतर सेवांच्या विभागवार बैठका
- आवश्यक्ता भासल्यास पुण्यातील मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेसची मदत घेणार
आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार
रस्ते घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करा, या कामात एकूण खर्चाचा आकडा फुगवला की नाही याचे उत्तर पालिकेकडून मिळावे, यासह मुंबईतील 15 वॉर्ड ऑफिसरच्या नियुक्त्या त्वरित कराव्यात अशी मागणी बैठकीत केली. आमच्या प्रमुख मागण्या मान्य करून तसे निर्देश अध्यक्षांनी दिले, अशी माहिती एक्सद्वारे आदित्य ठाकरे यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List