विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती पक्षपाती, महाविकास आघाडीची राज्यपालांकडे तक्रार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे हे सभागृहाच्या कामकाजात पक्षपातीपणा करत असून विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी करत आहेत, अशी तक्रार महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. आम्हाला न्याय द्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज राजभवन येथे राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने कामकाज करतात. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, महत्त्वपूर्ण चर्चा करताना विरोधी पक्षाची अडवणूक केली जात आहे, असे यावेळी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तिथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता सभागृहाचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने चालविले जात आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संवैधानिक हक्क डावलला जात आहे, असे यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही. पुरवणी मागणीच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री व राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, याकडेही यावेळी राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले. विधान परिषद सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिवसुद्धा उपस्थित नसतात. संबंधित खात्याचे राज्यमंत्री उपस्थित असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्याना चर्चेस उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे, अशा प्रकारे विधान परिषदेच्या सभापतींनी सभागृह चालविताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून, त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, अशी टीका दानवे यांनी यावेळी केली.
यावेळी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, विधानसभेतील शिवसेना गटनेते भास्कर जाधव, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना आमदार अनिल परब, अजय चौधरी, सुनील राऊत, सुनील शिंदे, सचिन अहिर, पैलास पाटील, बाळा नर, मनोज जामसुतकर, वरुण सरदेसाई, ज. मो. अभ्यंकर, काँग्रेसचे नाना पटोले, भाई जगताप, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सिद्धार्थ खरात आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List