टी शर्ट घालून विरोधक संसदेत; गदारोळामुळे कामकाज ठप्प; सीमांकन, मतदारयाद्या, शेतकरी, हिंदी भाषेवरून सरकारला घेरले
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज आज विरोधी पक्षांनी अक्षरशः गाजवले. डीएमकेच्या खासदारांनी कनिमोळी यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी घोषणा लिहीलेले टी-शर्ट परिधान करून निदर्शने केली. सीमांकन, मतदार याद्यांचा मुद्दा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हिंदी भाषा लादण्यावरून सरकारला घेरले. अशा स्थितीतही दोन्ही सभागृहातील कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे अखेर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले
पंजाबच्या काँग्रेस खासदारांनी पक्षाचे पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब- हरयाणा बॉर्डरवर आंदोलन करणाया शेतकऱयांविरोधात करण्यात आलेल्या कारवाई विरोधात निदर्शने केली. तर तामीळनाडूतील सीमांकनाच्या मुद्दय़ावरून डीएमके खासदारांनी जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकार या मुद्दय़ावर चर्चा करत नसून आम्हालाही या मुद्दय़ावर बोलू देत नाही. त्यामुळे आम्ही निष्पक्ष सीमांकनाच्या मागणीसाठी 22 मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याचे कनिमोळी यांनी सांगितले. निष्पक्ष सीमांकन आणि तामीळनाडू लढेल, तामीळनाडू जिंकेल, चुकीचे सीमांकन अशा घोषणा टी-शर्टवर लिहिण्यात आल्या होत्या.
सभागृहाची प्रतिष्ठा राखा; ओम बिर्ला भडकले
द्रमुक खासदारांना सरकारविरोधात घोषणा लिहिलेले टी-शर्ट परिधान करून आलेले पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला प्रचंड संतापले. खासदारांनी सभागृहाची मर्यादा राखली पाहिजे. सर्व खासदारांनी नियम 349 वाचले पाहिजे आणि त्यानुसार सभागृहात वागले पाहिजे, असे ओम बिर्ला म्हणाले. तसेच तुम्ही टी-शर्ट परिधान करून सभागृहात याल आणि सरकारविरोधात घोषणाबाजी कराल तर सभागृहाचे कामकाज चालणार नाही. जर तुम्ही टी-शर्ट काढून योग्य कपडे परिधान करून याल तरच कामकाज सुरू राहील असा इशारा बिर्ला यांनी दिला. परंतु, विरोधकांनी त्यांचे ऐकले नाही आणि सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचाही विरोधकांनी कडाडून विरोध केला. राज्यसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List