जाब विचारणाऱ्या पत्नीवर पती-सासूचा कोयत्याने हल्ला, ‘लाडक्या बहिणी’चे पैसे परस्पर खर्च केले
‘लाडकी बहीण’ योजनेतील मिळणाऱ्या पैशांवरून आता कुटुंबात कलह सुरू झाला आहे. मिळालेले पैसे परस्पर खर्च केल्याचा जाब विचारणाऱया महिलेला पती आणि सासूने जबर मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. निशा धनाजी लोंढे असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव असून, पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
माढा तालुक्यातील लोणी येथे राहणाऱया निशा धनाजी लोंढे (वय 28) यांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च असे दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते. हे पैसे पती धनाजी लोंढे याने परस्पर काढून खर्च केले. त्यामुळे पत्नी निशा हिने पतीला पैसे खर्च केल्याचा जाब विचारल्याने वाद सुरू झाला. यावेळी सासू रूपाबाई लोंढे ही मुलाची बाजू घेत वाद घालत होती. हा वाद वाढत गेल्याने पती आणि सासूने निशाला जबर मारहाण केली. पाय, गुडघा आणि हातावर कोयत्याने वार केल्याने निशा गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माढा पोलीस स्टेशनमध्ये पती धनाजी लोंढे व सासू रूपाबाई लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेड कॉन्स्टेबल रोपळे तपास करीत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांवरून आता अनेक कुटुंबांत कलह सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List