भाजप-शिंदेंची शिवसेना या विषयावर आमने-सामने, ठाण्यात दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये संघर्ष?
शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला. त्यानंतर कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची 14 गावांचा विषय तापला. ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयास त्यांनी विरोध केला. यामुळे या विषयावर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मतभेद उफाळले आहेत.
उद्धव ठाकरे गटाची टीका
वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत न करण्याची मागणी केली. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी “ही गावे नवी मुंबई महापालिकेतच राहणार आहे. आपण गणेश नाईक यांची समजूत घालू” अशी भूमिका घेतली आहे. महायुतीच्या भाजप आणि शिवसेनेच्या वादात आता ठाकरे गटाने उडी घेतली आहे. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांवर “१४ गावांना फुटबॉल बनवले जात आहे” अशी टीका केली.
नाईक-शिंदे संघर्ष?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयाला गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये शीळ तळोजामधील 14 गावे नवी मुंबई पालिकेत नको स्पष्ट लिहिण्यात आले आहे. या कारणामुळे आता ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष डोके वर काढताना दिसत आहे.
शिवसेनेची भूमिका, गणेश नाईकसोबत चर्चा करणार
शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांना गणेश नाईक यांच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी नाईक यांच्या सोबत आम्ही चर्चा करणार असल्याचे सांगितले. गणेश नाईक आमचे नेते आहेत. त्यांची समजूत काढणार आहे. या आधी ही 14 गावे नवी मुंबईत होती. या विषयावर गणेश नाईक यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करू. ही गाव नवी मुंबई महानगरपालिकेत राहील याबाबत आम्हाला कुठलीही शंका नाही, असे मत मोरे यांनी व्यक्त केले.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या या वादात आता ठाकरे गटानेही उडी घेतली आहे. कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी या १४ गावांना फुटबॉल बनवले आहे. सत्ताधारी पक्षांनी या गावांची पूर्णपणे वाट लावली आहे. रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा या ठिकाणी नाहीत. विकास ठप्प झाला आहे. गावात संघर्ष समिती बनवून राजकीय खेळी सुरू केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List